अजितदादांच्या ‘त्या’ गूढ प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज कुठे? राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांचा आपल्याच बड्या नेत्यांवर ‘विस्फोटक’ वार!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:अजितदादांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, दादांच्या एका अत्यंत विश्वासू ज्येष्ठ नेत्याने आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निष्ठेवर जळजळीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर दादा २८ जानेवारीला त्यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यातून विमानतळासाठी निघाले होते, तर त्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज मुख्यमंत्र्यांकडे का मागितले जात नाही?” असा बोचरा सवाल करत या नेत्याने मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या जोडगोळीचा चांगलाच समाचार घेतला आहे. या संशयास्पद मौनामुळे आता पक्षांतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
या ज्येष्ठ नेत्याने थेट आरोप केला आहे की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे केवळ स्वतःच्या कौटुंबिक हितासाठी आणि मुलांच्या राजकीय करिअरसाठी सत्तेला चिकटून आहेत. “पटेल यांना आपल्या मुलीचे स्थान आयपीएलमध्ये भक्कम करायचे आहे, तर तटकरे यांना आपल्या कन्येचे मंत्रिमंडळातील स्थान अधिक बळकट करायचे आहे. हे दोन्ही नेते ‘दादांच्या जाचातून एकदाचे सुटलो बुवा’ असा आनंद मनातल्या मनात साजरा करत आहेत की काय?” अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. सीबीआय चौकशीची मागणी आता करण्यापेक्षा ती तातडीने पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे का केली गेली नाही, असा आक्रमक पवित्रा या नेत्याने घेतला असून, ही जोडगोळी कधीही आमदारांना घेऊन भाजपवासी होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.
विशेष म्हणजे, विरोधी पक्षात असलेले रोहित पवार ज्या हिंमतीने आपल्या काकांचा आणि गुरूचा मृत्यू अपघात नसल्याचे सांगून चौकशीची राळ उठवत आहेत, त्याचे कौतुक करताना या नेत्याने स्वकियांचे कान टोचले. “रोहित पवारांच्या संघर्षाला पाठिंबा देण्याऐवजी ही जोडगोळी संभ्रम का पसरवत आहे?” असा सवाल करत त्यांनी आता संपूर्ण चेंडू उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला आहे. सुनेत्रा वहिनींनी आता वेळीच सावध होऊन पक्ष आणि सरकारमध्ये ‘आसूड’ हाती घेतला नाही, तर अजितदादांचे निष्ठावान आणि पक्ष दोन्ही धोक्यात येतील, असा गंभीर इशाराही या नेत्याने दिला आहे.




