टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीत फडणवीस, शिंदे टार्गेटवर

मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो : राज ठाकरे
राज्यकर्त्याचे प्रेम राज्यावर असावे, सत्तेवर नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : सत्तेवर असणाऱ्ऱ्यांना स्वतःचे घर भरायचे आहे, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सध्या सुरू असलेली निवडणूक सत्ता आणि पैशाच्या जोरावर लढली जात आहे. ज्या-ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या, तिथे सारे जण पैशाच्या जोरावर निवडून आले आहेत. यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाटेल तसे राजकारण केले आहे. अशा भाषेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मुलाखतीतून फडणवीस, शिंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.

दोन्ही ठाकरे बंधू २० वर्षांनंतर एकत्र आले आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेतली. निवडणूक हा मुख्य विषय होताच, पण मुंबई आणि मुंबईचे राजकारण, समाजकारण यावर दोघेही भरभरून बोलले. राऊत यांनी राजकारणाशी संबंधित प्रश्न विचारले, तर मांजरेकर यांनी सामाजिक प्रश्नांचा भडीमार केला.

काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना, भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत, त्यातून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा सूक्ष्म पण ठरवून केलेला प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. रोजच्या निर्णयांमधून, भाषणांमधून आणि प्रशासनाच्या कृतीतून ही भूमिका सातत्याने पुढे आणली जात आहे. राज्यातील भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणे म्हणजेच उपहास ठरेल. आज राज्य चालवणारे खरे निर्णयकर्ते नाहीत, तर खुर्चीवर बसवलेले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे हे लोक, जनतेच्या मनाचे नाही, तर ज्यांनी खुर्ची दिली त्या धन्याचे ऐकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईसारख्या महानगराच्या समस्या समजून घ्यायच्या असतील, तर त्या शहराशी नातं असावं लागतं. मुंबईकरांना काय हवे आहे, काय नको आहे, हे मुंबईत जन्मलेला आणि इथे वाढलेला माणूसच समजू शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सध्याचे सत्ताधारी केवळ स्वार्थी राजकारण करत असून त्यांच्या धोरणांमुळे मुंबईचे मोठे नुकसान होणार आहे. ही परिस्थिती रोखायची असेल, तर आता लोकांनी आपला संताप मतदानातून व्यक्त करणे गरजेचे आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सांगितले की, आजचे राज्यकर्ते खुर्चीवर प्रेम करणारे असून त्यांना राज्य, जनता किंवा विकासाशी काहीही देणेघेणे नाही. सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून सत्ता जणू विकत घेतली जात आहे. खरे राज्यकर्ते तेच असतात ज्यांचे प्रेम राज्यावर असते; सत्तेवर नसते.

मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांचे प्रेम केवळ सत्तेपुरते मर्यादित आहे. त्यामुळे प्रशासन, लोककल्याण आणि विकास हे विषय दुय्यम ठरत आहेत. दुर्दैवाने आज राज्य चालवणारे अनेक लोक मुंबईकर नाहीत. त्यामुळे मुंबईचे महत्त्वाचे प्रश्न, येथील जीवनशैली, स्थानिक समस्या आणि संवेदनशीलता त्यांना कधीही नीट समजणार नाही. ज्या पद्धतीने नोटा वाटून सत्ता आणता येते, त्याच ताकदीने विकासासाठी पुढाकार का घेतला जात नाही? मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचा विचार करताना दीर्घकालीन दृष्टी, स्थानिक जाण आणि संवेदनशील नेतृत्व आवश्यक असते; मात्र आजचे राज्यकर्ते त्या सर्व बाबतीत अपयशी ठरत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *