पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे ‘चेले’ बनले? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप; अमेरिकेच्या हाती मोदींची कोणती ‘काळी पत्रिका’?
विशेष प्रतिनिधी:”देशाला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चेले बनले आहेत का?” असा जळजळीत सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ट्रम्प हे मोदींना एका विशिष्ट माहितीच्या आधारे ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा खळबळजनक दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच, “मी नरेंद्र मोदींचे राजकीय करिअर संपवू शकतो,” असे विधान केल्याचा संदर्भ देत आंबेडकरांनी मोदींना थेट प्रश्न विचारले आहेत. ट्रम्प यांच्याकडे मोदींच्या अशा कोणत्या ‘काळ्या कारनाम्यांची’ गुपिते दडलेली आहेत, ज्याचा वापर करून ते भारतावर दबाव आणत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
देशाला ब्लॅकमेलिंगची शिक्षा का?
प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “मोदींच्या कोणत्या ‘काळ्या पत्रिके’मुळे ट्रम्प त्यांना घाबरवत आहेत आणि त्याची शिक्षा संपूर्ण देशाला का भोगावी लागत आहे? विश्वगुरू बनण्याच्या बाता मारणारे मोदी आता ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन देशाच्या हिताशी तडजोड करत आहेत का?” सध्या सोशल मीडियावर ट्रम्प यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यावरून नागरिकांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
या गंभीर आरोपांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन होत असल्याचे आंबेडकरांनी नमूद केले आहे. “मोदीजी, देश उत्तर मागत आहे!” असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपकडून अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र या विधानामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
—
Deepak Kaitke




