बदलापूर, दि.७,प्रतिनिधी:बदलापूर एमआयडीसी खरवई औद्योगिक क्षेत्रातील आग लागल्याची घटना समोर आली आहे.सलग १० ते १२ स्फोट झाले, तर आगीच्या ज्वाला जवळपास २ किलोमीटर परिसरातून आकाशात लोंबकळताना दिसत होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,बदलापूर एमआयडीसी खरवई औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र.डब्ल्यू १११ वर असलेल्या पॅसिफिक बायो केमिकल कंपनीत रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागून मोठे अग्नितांडव झाले.कंपनीतील एपीआय (ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट) प्लांटमध्ये ज्वलनशील रसायनांमुळे अचानक आग भडकली. काही वेळातच ही आग सॉल्व्हेंट स्टोरेज विभागात पसरली, जिथे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रवरूप रसायने साठवलेली असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
या आगीदरम्यान सलग १० ते १२ स्फोट झाले, तर आगीच्या ज्वाला जवळपास २ किलोमीटर परिसरातून आकाशात लोंबकळताना दिसत होत्या. स्फोटांचे आवाज दूरपर्यंत ऐकू येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीच्या शेजारी असलेल्या रहिवासी संकुलांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, अनेकांनी घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच कुळगाव–बदलापूर नगरपरिषद अग्निशमन दलाने अंबरनाथ नगरपरिषद अग्निशमन दल तसेच उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन दल यांना मदतीसाठी बोलवले असून तातडीने घटनास्थळी अनेक अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुळगाव–बदलापूर नगरपरिषद अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर वांगड यांनी आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान,महत्त्वाची बाब म्हणजे बदलापूर एमआयडीसी परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वायू गळतीची घटना घडली होती, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.




