बुलढाणा-अजिंठा राज्य मार्गावरील धाडनजीक झालेल्या भीषण अपघातात तिन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राज्य परिवहन मंडळाची बस आणि दुचाकीची भरवेगात धडक होऊन दुचाकी बसखाली आल्याने ही भीषण दुर्घटना घडली. तिन्ही मृतक ढालसावंगी येथील रहिवासी होते.
आज सोमवारी, ५ जानेवारीला संध्याकाळी हा अपघात घडला. छत्रपती संभाजीनगरकडून बुलढाणा जिल्ह्यातील धाडकड़े येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर भरवेगात धडक झाली. दुचाकी बसखाली अक्षरश: चिरडल्या गेल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धाडनजीकच्या करडीच्या (धाड) पुलावर ही दुर्घटना घडली. यातील एका युवकाच्या डोक्याची कवटी फुटून त्यांच्या मेंदूचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
मलकापूर आगाराची बस छत्रपती संभाजीनगर येथून मलकापूर (जि. बुलढाणा)कडे जात होती. तर ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील हे तिघे मोटारसायकलने धाडवरून करडी गावाच्या दिशेने जात होते. सदर बस सायंकाळी करडी (धाड) येथील पुलावर येताच या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अंकुश पाडळे (३२), रवी चंदनशिव (२३) आणि कैलास शिंदे (३०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या घरी एकच आकांत उसळला. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. धाड पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.



