मुंबई महापालिकेच्या ‘तिजोरी’वर भाजपचा ‘शिवसैनिक’ बसणार; प्रभाकर शिंदेंच्या रूपाने जुन्या अनुभवावर पक्षश्रेष्ठींचे शिक्कामोर्तब!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या राजकारणात सत्तेची खरी चावी मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’च्या अध्यक्षपदासाठी भाजपने अनुभवी चेहरा मैदानात उतरवला आहे. मूळचे शिवसैनिक असलेले आणि सध्या भाजपमध्ये सक्रिय असलेले प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली असून, ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडीमुळे महापालिकेतील गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनुभवाला महत्त्व, चर्चेतील नावांना बगल
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मकरंद नार्वेकर आणि प्रकाश दरेकर यांसारख्या दिग्गज भाजप नेत्यांच्या नावांची मोठी चर्चा होती. मात्र, महापालिकेतील प्रशासकीय कामाचा आणि सभागृह नेतेपदाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या प्रभाकर शिंदेंना भाजपने पसंती दिली. शिंदे यांनी शिवसेनेत असताना अनेक वर्षे पालिकेचे कामकाज जवळून पाहिले आहे. त्यांच्या या अनुभवाचा वापर करून आगामी काळात पालिकेच्या तिजोरीवर नियंत्रण मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
शिक्षण समितीची धुरा शिरवाडकरांकडे
केवळ स्थायी समितीच नव्हे, तर शिक्षण समितीसाठीही भाजपने आपली मोहरे निश्चित केली आहेत. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आज होणाऱ्या अर्ज प्रक्रियेमुळे पालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पक्षांतर्गत ‘नाराजी’चा सूर उमटणार?
भाजपच्या या निर्णयामुळे पक्षात ‘निष्ठवंता’ विरुद्ध ‘आयात’ असा नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. नवनियुक्त महापौर रितू तावडे या मूळच्या काँग्रेसच्या आहेत, तर आता स्थायी समितीचे पद मिळालेले प्रभाकर शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या मूळ भाजप नगरसेवकांना बाजूला सारून बाहेरून आलेल्यांना महत्त्वाची पदे मिळत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुभवी शिंदेंची निवड भाजपसाठी फायदेशीर ठरते की अंतर्गत वादाला तोंड फोडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
—
Deepak Kaitke




