ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीचे काम पूर्ण झाले असून हा पूल कधी सुरू होणार याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे. मात्र आता नगरसेवक निवडून आलेले असल्यामुळे या पुलाच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्ष पुढे सरसावणार आहेत. त्यामुळे महापालिका स्थापन झाल्यानंतरच या पुलाचे उद्घाटन होणार आहे.
मुंबईत एकाच वेळी रेल्वे मार्गावरील अनेक पुलांची कामे सुरु आहेत. यापैकी बहुतांशी पुलांची कामे पूर्ण होत आली आहेत. त्यात आता मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने बेलासिस पुलाचे कामही पूर्ण केले आहे. या पुलाचे काम विक्रमी कालावधीत म्हणजेच अवघ्या १५ महिने ६ दिवसांत पूर्ण झाले आहे. निविदा अटी – शर्तीनुसार या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून ४ महिन्यांचा अवकाश आहे. या पुलाचे काम निर्धारित कालावधीपेक्षा चार महिने आधीच पूर्ण झाले आहे. मात्र पूल सुरू होण्यास रहिवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.




