आयोगाचा कडक निर्णय, राजकीय पक्षांमध्ये संताप – नेमकी मतमोजणी कशी होणार?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतमोजणीवेळी निर्माण झालेला गोंधळ, तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता, Brihanmumbai Municipal Corporation निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने यावेळी अत्यंत सावध, कडक आणि नियंत्रणात्मक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करणारा एक महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला असून, एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता, एकामागून एक वॉर्डनिहाय मतमोजणी करण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे यंदाच्या BMC निवडणुकीचा निकाल उशिरा हाती येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
एकावेळी एकच वॉर्ड; उमेदवारांना तासन्तास निकालाची प्रतीक्षा
मुंबईतील प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या वॉर्डांची मतमोजणी एकत्र न करता, क्रमवारीनुसार फक्त एका वॉर्डाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे अनेक उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतमोजणी केंद्रांवर तासन्तास ताटकळत राहणार असल्याचे चित्र आहे.
राजकीय पक्षांचा तीव्र आक्षेप, तरीही आयोग निर्णयावर ठाम
एका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच ते सहा वॉर्डांची मतमोजणी एकाचवेळी सुरू करावी, अशी मागणी राजकीय पक्षांनी यापूर्वीच केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी साफ फेटाळून लावली आहे.
मतमोजणी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता, शिस्त आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण आयोगाच्या प्रतिनिधींनी दिले आहे. मात्र तरीही अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून आयोगाकडे पुन्हा दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
१५ जानेवारी मतदान, १६ जानेवारी मतमोजणी; निकाल उशिरा?
मुंबईतील २२७ वॉर्डांत १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काही वॉर्डांची जबाबदारी देण्यात आली आहे.
१६ जानेवारी रोजी मतमोजणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये पार पडणार आहे. मात्र एकावेळी एकच वॉर्ड मोजण्यात येणार असल्याने, अनेक वॉर्डांचे निकाल संध्याकाळपर्यंत किंवा उशिरापर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतमोजणीची नेमकी रूपरेषा काय?
मुंबई महानगरपालिकेच्या ए, बी आणि सी विभागांतील वॉर्डांसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
या अंतर्गत २०७ ते २२७ क्रमांकाच्या वॉर्डांची मतमोजणी करण्यात येणार आहे.
सर्वप्रथम २०७ क्रमांकाच्या वॉर्डाची मतमोजणी सुरू होणार
ती पूर्ण झाल्यानंतर २०८ क्रमांकाच्या वॉर्डाची मतमोजणी
अशाच क्रमाने पुढील वॉर्डांची मतमोजणी
अखेरच्या वॉर्डाच्या निकालासाठी सर्वाधिक वेळ लागण्याची शक्यता
निकाल रखडणार; मुंबईत राजकीय तापमान शिगेला!
या निर्णयामुळे एकीकडे मतमोजणीत शिस्त व पारदर्शकता राखली जाणार असली, तरी दुसरीकडे निकालातील विलंबामुळे राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. उमेदवार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता टोकाला पोहोचणार पोहोचणार.




