आलेख उल्का देवरुखकर

हळदी कुंकू

पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते.

कुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेषत: कोकण, महाबळेश्वर, आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात. कुंकवाची झाडे १२-१५ फुटापर्यंत वाढतात. साल जाड असते. पाने सदापर्णी लंबवर्तुळाकार असून पानाच्या शिरा तांबड्या असतात. फुलाचा रंग पिवळसर असून त्यांना देठ नसतात. फळे छोटी असून फळात छोटी बी असून त्यावर जी तांबडी भुकटी असते, तेच खरे कुंकू . हे कुंकू फार मौल्यवान असते. कृत्रिम कुंकू चुना व हळद यांच्या मिश्रणापासून बनवतात. तसेच हळद व हिंगुळ किंवा करडईपासून कुंकू बनवतात.

कुंकूमतिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुद्धिपूजेचे अधिष्ठान आहे. ईशपूजनानंतर तात्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करायचे. प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि नंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन होय. तिलक आस्तिकांचेही चिन्ह आहे.
आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि चिरंतन आहे. ते लावण्याच्या पद्धतीत कालानुसार स्थित्यंतरे होत गेली. अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध व आता आधुनिक काळात स्त्रिया टिकल्या वापरतात. पण यात मांगल्याचे व सौभाग्याचे ओज आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेज चिरंतन असून हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे .

Ulka Devrukhkar

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *