अकोल्यात बिश्नोई गँगची एन्ट्री? भाजप आमदाराकडून २ कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी शहराध्यक्षाला दिला ‘काँट्रॅक्ट’!
विशेष प्रतिनिधी:विदर्भाच्या शांत अकोला जिल्ह्यात सध्या एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या धमकीने राजकीय आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रिय हस्तक शुभम लोणकर याने थेट भाजपच्या शहराध्यक्षांना लक्ष्य करत २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. विशेष म्हणजे, ही खंडणी स्वतः न देता अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून ती वसूल करून देण्याची धक्कादायक अट शुभमने घातली आहे. “आमदाराकडून पैसे वसूल करून दे, अन्यथा तुम्हा दोघांनाही पाहून घेईन,” अशी थेट धमकी सिग्नल ॲपद्वारे देण्यात आल्याने अकोल्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे थेट बाबा सिद्दिकी हत्याकांड आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराशी जोडले गेले आहेत. धमकी देणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी आहे. यापूर्वी बंदूक तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या, मात्र जामिनावर सुटल्यापासून तो फरार आहे. आता त्याने थेट आपल्याच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी वेठीस धरल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी आलेल्या भाजप पदाधिकाऱ्याच्या सुरक्षेत तातडीने वाढ करून त्यांना बंदूकधारी पोलीस रक्षक पुरवण्यात आले आहेत.
सध्या अकोट शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शुभम लोणकरचे जाळे आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याचे दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नेव्होरीतील त्याच्या बंद घरामागे आणि या धमकीमागे नेमके काय गुपित दडले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. भरदिवसा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना बिश्नोई गँगच्या नावाने धमक्या येत असल्याने, आता अकोल्याचे पोलीस या टोळीचा बिमोड कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
Deepak Kaitke




