अजितदादांचा अपघात की घातपात? आता थेट ‘CBI’ मैदानात उतरणार; फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रं फिरली!
विशेष प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व ज्या विमान अपघाताने संपलं, त्या घटनेचं गूढ उकलण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या भीषण अपघाताच्या तपासाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, या प्रकरणाचा तपास थेट ‘सीबीआय’कडे (CBI) सोपवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, खुद्द अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि चिरंजीव पार्थ पवार यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पवार कुटुंबीय आणि दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडे तगादा
मुंबईत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर पोहोचले. अजितदादांच्या मृत्यूमागे केवळ तांत्रिक बिघाड आहे की एखादं मोठं षडयंत्र, हे शोधण्यासाठी आता स्थानिक यंत्रणांपेक्षा केंद्रीय अन्वेषण विभागाचा (CBI) हस्तक्षेप गरजेचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सुनील तटकरे यांचा थेट निशाणा: “व्यापक तपासाची गरज!”
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “स्थानिक स्तरावर तपास सुरू असला, तरी या घटनेभोवती संशयाचे जाळे विणले गेले आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले गंभीर मुद्दे आणि जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सीबीआयसारख्या सक्षम यंत्रणेची गरज आहे. या प्रकरणाचा आवाका मोठा असून त्यातील प्रत्येक धागादोरा तपासला गेला पाहिजे,” असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले.
फडणवीसांचे आश्वासन आणि अमित शहांची भूमिका
मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची तातडीने दखल घेतली असून, राष्ट्रवादीच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. “मी स्वतः या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करेन आणि राज्य सरकारमार्फत तसा अधिकृत पत्रव्यवहार केला जाईल,” असे फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आता या प्रकरणाचा चेंडू दिल्लीच्या कोर्टात गेला आहे.
काय दडलंय त्या अपघाताच्या रात्री?
एकूणच, रोहित पवारांनी पुराव्यांशी छेडछाड होण्याबाबत व्यक्त केलेली भीती आणि आता खुद्द पक्षानेच सीबीआय चौकशीची धरलेली लाट, यामुळे या प्रकरणाला आता केवळ अपघाताचे स्वरूप उरलेले नाही. एखादं मोठं सत्य दडवण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न आता प्रत्येक मराठी माणसाला पडला आहे.
आता दिल्लीतून सीबीआय चौकशीसाठी हिरवा कंदील मिळताच, त्या ‘ब्लॅक बॉक्स’मधील शेवटच्या संभाषणाचे आणि अपघाताचे नेमके सत्य बाहेर येईल का? याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
—
Deepak Kaitke




