वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या घटनेमागे काही ‘अदृश्य शक्तींचा’ हात होता का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींनी ज्या घाईने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट ‘कट-कारस्थाना’चा वास येत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पण खरोखरच दोन पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून हा डाव शिजला का?
विमान अपघाताची सावली अन् संशयाची सुई
अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला दादा जखमी असल्याच्या बातम्या आल्या आणि अचानक त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा झाली. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता सीआयडी (CID) पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र, चौकशी पूर्ण होण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
“शपथविधीची घाई का? भाजपचा दबाव होता?”
विजय वडेट्टीवार यांनी सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीवर अत्यंत टोकदार भाषेत टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “अजितदादांच्या निधनानंतर दहावा-तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली, हे आपल्या हिंदू संस्कृतीला धरून नाही. जनतेच्या मनात प्रश्न आहे की, एवढी घाई का केली गेली? कदाचित भाजपच्या दबावामुळेच हा निर्णय झाला असावा.” दोन राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येऊ नयेत, यासाठीच हा सर्व कट रचला गेला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या प्रवक्त्यांना चोख प्रत्युत्तर!
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींनी घेतलेल्या शपथेचा दाखला दिला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी जोरदार हल्ला चढवला. “पंतप्रधान पद हे घटनात्मक पद असून ते एकही दिवस रिकामं ठेवता येत नाही. पण ‘उपमुख्यमंत्रिपद’ हे काही तसं घटनात्मक पद नाही. मग तेरावा होईपर्यंत थांबायला काय हरकत होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपला केवळ आपली सत्ता आणि वाटाघाटी टिकवून ठेवायच्या होत्या, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राजकारण ‘सडक’ झालंय!
अजितदादांच्या मृत्यूवरून आणि विलीनीकरणाच्या चर्चेवरून सुरू असलेल्या या रणधुमाळीत शशिकांत शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राचं राजकारण आता अत्यंत घाणेरडं आणि सडकलेलं झालं आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनीही सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं सांगून या वादात अधिकच भर घातली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ‘कटाच्या’ आरोपांनंतर आता राज्य सरकार आणि भाजप यावर काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सीआयडी चौकशीतून विमानाचा अपघात तांत्रिक होता की घातपात, हे स्पष्ट होईलच; पण त्याआधी लागलेली ही राजकीय ठिणगी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वणवा पेटवण्याची शक्यता आहे.
—
Deepak Kaitke





