राजकारण

अजितदादांच्या विचारांचा वारसा आता घराघरांत पोहोचणार? अण्णा बनसोडे यांनी पुकारले राज्यव्यापी सक्षमीकरण अभियान!

विशेष प्रतिनिधी, मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांच्या निधनानंतर, त्यांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षाचा सामाजिक न्याय विभाग आता आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जिल्हास्तरीय बैठकीत, राज्यभर ‘अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबवण्याचा ऐतिहासिक निर्धार करण्यात आला. “दादांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी दिलेला लढा आता अधिक तीव्रतेने पुढे नेऊ,” अशी शपथच यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली.
या बैठकीत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, आगामी काळात पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी राज्याची सहा विभागांत विभागणी करण्यात आली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण अशा सहा क्षेत्रांत विशेष मोहिमा राबवून वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कंबर कसणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अधिक सक्षम केला जाईल आणि दादांनी आखून दिलेली विकासकामे पूर्णत्वास नेली जातील, असा ठाम विश्वास अण्णा बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
केवळ बैठकांपुरते मर्यादित न राहता, जिल्हा आणि तालुका स्तरावर जनसंवाद मेळावे घेऊन शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक वंचितापर्यंत पोहोचवण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली. सामाजिक न्याय विभागाची भूमिका आता अधिक सक्रिय आणि थेट जनतेशी जोडलेली असेल, अशी सूचनाही बनसोडे यांनी जिल्हाध्यक्षांना दिली. अजितदादांच्या कार्याचा गौरव आणि मागासवर्गीयांचे सक्षमीकरण या दुहेरी उद्देशाने सुरू होणाऱ्या या अभियानामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस आपली नवी ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज झाली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *