टॉप स्टोरी महाराष्ट्र

अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला – प्रफुल पटेल

मुंबई दि. २८ जानेवारी – आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

गेली अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. जेव्हा-जेव्हा दादांसोबत भेट होत असे, ते नेहमीच आस्थेने चौकशी करत. तब्येतीची काळजी घेण्याचा नेहमीच सल्ला देत असत.त्यांचे आणि माझे राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंध होते. दादांचे निधन ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे असेही प्रफुल पटेल यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दादांच्या निधनाने राजकारणातील एक कुशल प्रशासक, कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व आपण गमावले आहे. जवळपास ३५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले, जनतेसाठी तत्पर असणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व घडवले तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढा दिला. ज्या ज्या वेळी दादांशी भेट व्हायची, तेव्हा-तेव्हा सामान्य माणसाच्या अडीअडचणी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, हे आपुलकीने व तळमळीने ते मांडायचे आणि त्यासाठी आग्रही असायचे हेही आवर्जून प्रफुल पटेल यांनी नमूद केले आहे.

सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व आज आपल्यात राहिले नाही, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करत तसेच पवार कुटुंबियांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करत प्रफुल पटेल यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *