टॉप स्टोरी महाराष्ट्र

अजितपर्व संपले! राज्याच्या राजकारणातील वादळ शांत; महायुतीचे दोन्ही दिग्गज नेते तातडीने बारामतीला का निघाले?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर हाऊस’ आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. या वृत्ताने केवळ राजकीय वर्तुळच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका कार्यक्षम आणि धडाडीच्या पर्वाचा असा शेवट होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.
फडणवीस-शिंदे तातडीने बारामतीकडे रवाना
घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मुंबईतील सर्व महत्त्वाचे कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही काही वेळातच विशेष विमानाने बारामतीकडे रवाना होत आहेत. आपल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ बारामतीत उपस्थित राहण्याची शक्यता असून, तिथे अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
शासकीय निर्णय आणि शोककाळ
अजित पवारांच्या गौरवशाली राजकीय प्रवासाला आदरांजली म्हणून राज्य प्रशासनाने तातडीने खालील घोषणा केल्या आहेत:
३ दिवसांचा राज्यव्यापी दुखवटा: आजपासून ३० जानेवारीपर्यंत संपूर्ण राज्यात अधिकृत शोक पाळला जाईल.
आज कार्यालयांना सुट्टी: दुःखद निधनामुळे आदरांजली म्हणून आज, २८ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ध्वज अर्ध्यावर: या तीन दिवसांच्या काळात राज्यातील सर्व मुख्य शासकीय इमारतींवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवून दुखवटा व्यक्त केला जाईल.
प्रशासन सतर्क; बारामतीत मोठा बंदोबस्त
मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागाने (Protocol Department) सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना हाय-अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारामती आणि पुणे परिसरात समर्थकांची होणारी गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.
एका शब्दावर प्रशासन हालवणारा आणि ‘दादा’ या नावाने लोकप्रिय असलेला नेता आज काळाच्या पडद्याआड गेल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधी भरून निघणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *