नवी मुंबई:प्रथम महासभेतील मंजुर मालमत्ता कराच्या व्याजाच्या शास्ती दराची अंमलबजावणी करणेस व थकीत मालमत्ता कराच्या महसूली उत्पन्नाच्या वसुली करीता करधारकांसाठी अभय योजना लागू करणेबाबत नगरसेवक निशांत भगत यांचे मागणी महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या कडे केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्देशांनुसार नुकत्याच संपन्न झालेल्या प्रथम महासभेच्या द्वितीय दिनाच्या महासभेत नवी मुंबईतील विविध निवासी घटकांतील नागरिकांनी गरजेपोटी केलेल्या निवासी बांधकामांवरील मालमत्ता करांवरील असलेल्या २०० % कर वाढ व्याज दराची शास्ती केवळ ५ % करण्याचा लोकहिताचा निर्णय महासभेने सर्वानुमते घेऊन तसा ठराव पास केला आहे, त्या ठरवाची अंमलबजावणी करण्याचे व त्यानुसार मालमत्ता कर देयके संबंधित बाधितांना देण्याबाबतीत कार्यवाही करण्याबाबत सूचना महापौर यांनी प्रशासनास करावी या मुख्य मागणीचे पत्र नगरसेवक निशांत भगत यांनी महापौर यांच्याकडे व महापालिका आयुक्तानां दिले आहे.
वरील मागणीस अनुसरून मालमत्ता कर विभागामार्फत थकीत असलेल्या सर्वच प्रकारातील मालमत्ता धारकांच्या रक्कमेंचा भरणा होऊन महापालिकेस महसूल प्राप्त व्हावा याहेतुने विशिष्ट कालावधी साठी प्रोत्साहनात्मक अभय योजना (Amnesty Scheme) देखील सूरू करावी, जेणेकरून नागरिकांचे व महापालिकेचे हित साधणे सुलभ होणार असल्याचे नगरसेवक निशांत करसन भगत यांनी पत्रात नमूद केले आहे.




