टॉप स्टोरी मुंबई

अमृता फडणवीसांचा ‘बँकिंग’ला रामराम; २३ वर्षांच्या कॉर्पोरेट इनिंगचा अचानक समारोप केल्याने चर्चांना उधाण!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अमृता फडणवीस यांनी कॉर्पोरेट विश्वातून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. ॲक्सिस बँकेतील तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासाला त्यांनी पूर्णविराम दिला असून, सोशल मीडियावरील त्यांच्या एका भावूक पोस्टने राजकीय आणि बँकिंग वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका प्रशिक्षणार्थी मुलीपासून सुरू झालेला हा प्रवास बँकेच्या ‘सिनियर व्हाईस प्रेसिडेंट’ पदापर्यंत कसा पोहोचला, याची रोमांचक कहाणी आता समोर आली आहे.
अमृता फडणवीस यांनी २३ वर्षांपूर्वी केवळ एक ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ म्हणून या बँकेत पाऊल ठेवले होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी ही ओळख बाजूला सारून त्यांनी बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक बाजू आणि कठीण आव्हाने पेलत आपली कारकीर्द घडवली.

ब्रँच ऑपरेशन्स, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी आणि कस्टमर रिलेशन्स अशा विविध विभागांत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. स्वतःच्या मेहनतीने वरिष्ठ उपाध्यक्ष पदापर्यंत झेप घेणाऱ्या अमृता यांनी निवृत्ती घेताना “ॲक्सिस बँक हे माझ्यासाठी केवळ कार्यालय नसून माझे दुसरे घर होते,” अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये त्यांनी बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले आहेत. इथून बाहेर पडताना मन कृतज्ञतेने भरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २३ वर्षांची ही प्रदीर्घ कॉर्पोरेट इनिंग थांबवल्यानंतर आता अमृता फडणवीस आपला पूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी देणार की संगीत क्षेत्रात काही नवीन धमाका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका महत्त्वाच्या पदावरून त्यांनी घेतलेली ही निवृत्ती त्यांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *