टॉप स्टोरी महाराष्ट्र

अर्जात नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या ‘लाडक्या बहिणीं’ना आपली चूक सुधारण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शेवटची संधी मिळणार का?

मुंबई (विशेष प्रतिनिधी):राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या एका तांत्रिक कारणामुळे चर्चेत असून, ई-केवायसी करताना नजरचुकीने चुकीची माहिती भरलेल्या लाभार्थी महिलांना आपली चूक सुधारण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे.

महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक काढले असून, त्यानुसार ज्या महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत किंवा निवृत्तीवेतनधारक असल्याचा चुकीचा पर्याय निवडला होता, त्यांना आता पोर्टलवर जाऊन त्यात बदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत या योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, मात्र यादरम्यान अनेक महिलांनी घरातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसतानाही अनावधानाने ‘होय’ असा पर्याय निवडला होता, ज्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.

ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली असून, ३१ मार्च ही यासाठीची अंतिम मुदत असणार आहे. ज्या महिलांकडून केवळ पर्याय निवडताना चूक झाली आहे, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, ही वाढीव मुदत केवळ एकदाच दिली जात असून, ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जात सुधारणा करण्यासाठी पुन्हा वेळ दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित महिलांनी तातडीने या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज दुरुस्त करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *