नाशिक | शहरात बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर व चिंताजनक बनला आहे. कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प उभारणाऱ्या धनदांडग्या बिल्डरांकडून मजुरांच्या सुरक्षा उपाययोजनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, त्याची किंमत मात्र निष्पाप मजुरांना जीव देऊन चुकवावी लागत आहे.अधिक धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही संबंधित मजुराच्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरडी सर्कल परिसरातील एका नावाजलेल्या बिल्डरच्या सुरू असलेल्या प्रकल्पावर ही भीषण घटना घडली. बेसमेंटमध्ये काम करत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला आणि त्याखाली २४ वर्षीय नागेंद्र सत्यनारायण यादव हा तरुण गुदमरून मृत्युमुखी पडला. त्याच्यासोबत काम करणारे आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.इतका गंभीर प्रकार घडूनही पोलिसांकडून केवळ ‘आकस्मित मृत्यू’ची नोंद करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माती कोसळण्यामागे सुरक्षा उपायांचा अभाव, योग्य आधारव्यवस्था नसणे आणि तांत्रिक निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात असताना संबंधित बिल्डरचे नाव तपासातून वगळले गेल्याची चर्चा आहे.त्यामुळेच पोलीस तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. घटना आरडी सर्कल परिसरात घडली असतानाही पोलिसांनी घटनास्थळाबाबत अस्पष्ट माहिती दिल्याचा आरोप आहे.
कोणत्या प्रकल्पावर अपघात झाला, संबंधित बिल्डर कोण, याची स्पष्ट नोंद अधिकृत माहितीपत्रकात नसल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. साईट इंजिनियर प्रदीप सोनवणे यांनी माहिती दिल्याचे नमूद करण्यात आले असले तरी, संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. यापूर्वीही याच बिल्डरच्या प्रकल्पावर उंचावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या प्रकरणातही बिल्डरवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे “बांधकाम मजुरांचे जीवन इतके स्वस्त झाले आहे का?” असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
एखाद्या मजूराचा मृत्यू झाल्यानंतर काही बिल्डर्सकडून अत्यल्प आर्थिक मदत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप आहे. शिवाय घटनेची वाच्यता करू नये म्हणून इतर मजुरांवर दबाव टाकला जातो, धमक्या दिल्या जातात, असेही समोर येत आहे. त्यामुळे कोणीही उघडपणे बोलण्यास धजावत नाही.
कायद्यानुसार कोणत्याही बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी संबंधित बिल्डरची असते. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, मजबूत आधाररचना, माती कोसळू नये यासाठी तांत्रिक उपाययोजना, प्रशिक्षित पर्यवेक्षण हे सर्व बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र या नियमांचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. मागील दीड महिन्यातही याच परिसरात दुसऱ्या एका प्रकल्पावर मजुराचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातही बिल्डरला वगळण्यात आल्याची चर्चा आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागेंद्र यादव याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित बिल्डरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच जखमी मजुरांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च बिल्डरकडून वसूल करावा,अशी जोरदार मागणी होत आहे.
जोपर्यंत पोलिस प्रशासन निष्काळजी बिल्डरांना थेट जबाबदार धरून कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत मजुरांचे प्राण धोक्यातच राहतील, असे स्पष्ट मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त केले जात आहे. कोट्यवधींच्या इमारती उभ्या राहतात पण त्या उभारताना मजुरांचे जीव धुळीत मिळत असतील, तर विकासाच्या या आराखड्याला मानवी चेहरा आहे का,असा सवाल आता नाशिककरांसमोर उभा आहे.
न्यायव्यवस्थेचा पराभव नाही का?
कायद्यानुसार बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या प्रत्येक मजुराची सुरक्षा ही संबंधित बिल्डरची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात हेल्मेट नाही, सेफ्टी बेल्ट नाही, मजबूत आधाररचना नाही.नागेंद्र यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. एका तरुणाचा जीव गेला, दोन जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत, तरीही जबाबदारांवर कठोर गुन्हा दाखल होत नसेल, तर हा न्यायव्यवस्थेचा पराभव नाही का?
बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न?
इतक्या भीषण घटनेनंतर पोलिसांकडून केवळ ‘आकस्मित मृत्यू’ची नोंद करण्यात आली. माती कोसळली कशी? सुरक्षा उपाययोजना होत्या का? बेसमेंटमध्ये काम करताना तांत्रिक देखरेख होती का? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी प्रकरण सॉफ्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.सुरक्षेविना काम करणाऱ्या मजुरांचा जीव गेला, तरी संबंधित बिल्डरचे नाव अधिकृत नोंदीत स्पष्टपणे का नाही? घटनास्थळाची माहितीही अस्पष्ट का? हा केवळ निष्काळजीपणा आहे की बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न? शहरात उघडपणे चर्चा सुरू आहे.




