उल्हासनगर , दि . २१ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची सत्ता कोणाकडे जाणार या बाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच सेना भाजपा युती होण्याचे संकेत मिळत आहेत . खा श्रीकांत शिंदे यांनी पत्रकाराना माहीती देताना सांगितले आहे, की उल्हासनगर महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचे सांगुन हा निर्णय मा . एकनाथ शिंदे व भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे घेणार आहेत.
उल्हासनगर महापालिकेची निवडणुक सेना भाजपा हे अटी तटीने लढत होते. महायुतीला बाजुला करत भाजपाने स्वबळावर ३७ जागा निवडणुन आणल्या आहेत. तर शिवसेनेने सुध्दा भाजपाला टक्कर देत ३६ जागावर विजय मिळवला असुन महापौर पदासाठी दोन्ही पक्षानी कंबर कसली होती. वंचित चे दोन नगरसेवक व एक पक्ष नगरसेवक आणि कॉंग्रेस चा एक नगरसेवक असे मिळुन शिवसेने कडे ४१ मॅजिक आकडा झाला आहे. तर आज कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडे या ४१ नगरसेवकांची नोंदणी सुध्दा झाली आहे. मात्र पुन्हा महायुतीचे गुऱ्हाळ पुढे आले असुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे रविंद्र चव्हाण यांच्यात महायुतीचे खलबते सुरु असल्याने महायुतीचाच महापौर होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
या बाबत खा . डॉ श्रीकांत शिंदे यांनी माहीती देताना सांगितले की राज्यात शिवसेना भाजप युती आहे. उल्हासनगर महापालिकेत सुध्दा शिवसेना भाजप युती होणार असुन युतीचाच महापौर बसणार असल्याचे संकेत दिले आहेत. सदर निर्णय मा . एकनाथ शिंदे व रविंद्र चव्हाण हे घेणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान सेना भाजपा यांची युती झाली तर वंचित बहुजन आघाडी व अपक्ष , कॉंग्रेस यांचे महत्व कमी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. कदाचित युती झाली नाही तर शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे.




