कसारा :– विकास कामांवर लक्ष केंद्रित करुन रेल्वे प्रशासना मार्फ़त बजावण्यात आलेल्या नोटीसांमुळे 70 ते 80 वर्षांहुन अधिक कालावधी पासुन वास्तव्यास असलेल्या कसा-यातील बहुतांश नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याने येथील सर्वच पक्षीय एकवटले आहेत.विकासाच्या नावाखाली राहती संकुले आणि बाजारपेठेतील छोटी दुकाने निष्कासित करण्यात येऊन गाव भकास होउ नये म्हणून ‘ कसारा गाव बचाव कृति समिती ‘ परिश्रम घेत आहे.
गेल्या आठवड्यात ठाणे जिल्हाधिकारी यांना तर त्या अगोदर ना.रामदास आठवले यांच्या कड़े समितीने व्यथा मांडल्या असुन आज सोमवारी शहापुर तहसिल दारांना निवेदनाद्वारे विविध विभागांची बैठक त्वरित लावण्याची विनंती करण्यात आली आहे.या मध्ये समितीसह रेल्वे ,वनविभाग,भूमि अभिलेख,महसूल,सार्वजनिक बांधकाम आदि विभागांच्या अधिका-यांसोबत एकत्रित बैठक आयोजित करण्याची विनंती तहसीलदार परमेश्वर कोसुळे यांना करण्यात आली.त्यांनी देखील समितीस सकारात्मक प्रतिसाद दिला.मात्र अपेक्षित सहकार्य न झाल्यास येत्या 10 फेब्रूवारी रोजी कसारा बचाव कृती समितीच्या वतीने ‘ कसारा बंद ‘ चा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देते समयी समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.



