खासगी शाळांना टक्कर देणार पालिकेचा ‘स्मार्ट’ पॅटर्न! ४,२४८ कोटींच्या बजेटमध्ये डिजिटल वर्ग अन् विद्यार्थ्यांसाठी ‘जादुई पिटारा’
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आता कात टाकणार असून, विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आणि वर्गांमध्ये डिजिटल बोर्ड दिसणार आहेत. आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी शिक्षण विभागाने ४,२४८.०८ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प सादर केला आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सादर झालेल्या या बजेटमध्ये ‘डिजिटल क्रांती’ आणि ‘विद्यार्थी सुरक्षा’ या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मांडलेल्या या आराखड्यात पालिकेच्या १,२०३ शाळांमधील सुमारे ८ हजार वर्गखोल्या हायटेक करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इयत्ता ९ वीच्या १९ हजार विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘टॅब’ दिले जाणार आहेत, ज्यामुळे दप्तराचे ओझे कमी होऊन शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
‘मिशन सफल’ आणि ‘इको वॉरियर्स’
केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी यंदा ‘मिशन सफल’ (SAFAL) राबवण्यात येणार आहे. यात संगीत, कला, स्काऊट-गाईड आणि शारीरिक शिक्षणावर भर दिला जाईल. तसेच, पर्यावरणाची ओढ निर्माण करण्यासाठी ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इको वॉरियर्स’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, ज्यातून टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे कवच
मुंबईतील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ४२ कोटींची तरतूद केली असून, पालिकेच्या सर्व शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयांचे अद्ययावतीकरण आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी ५ कोटींचा निधी प्रस्तावित आहे.
एकूण ३,७५८.०८ कोटींचा महसुली खर्च आणि ४९० कोटींची भांडवली कामे असा हा विस्तीर्ण अर्थसंकल्प मुंबईच्या शैक्षणिक विकासाची नवी दिशा ठरवणारा ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८३ कोटींची वाढ करून पालिकेने आपल्या शाळा ‘हायटेक’ करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.




