घड्याळ चालू आहे, पण दिशा ठरलेली नाही:राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची काटे कुठल्या दिशेने वळतील?
(डॉ. प्रवीण डबली)अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नाही, तर निर्णयक्षमता, धाडस, प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणाऱ्या नेतृत्त्वाच्या अभावाची आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या सत्ताराजकारणात अजित पवार हे केंद्रस्थानी होते. त्यांच्या जाण्याने थांबलेली घडी आता पुढे सरकणारच आहे, मात्र ती कुठल्या दिशेने जाईल, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला अस्वस्थ करणारा आहे.
तीन वाटांवर उभी असलेली राष्ट्रवादी
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट तीन ठळक पर्यायांच्या उंबरठ्यावर उभा आहे.
पहिला पर्याय : शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येणे
हा पर्याय भावनिकदृष्ट्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक जवळचा आहे. ‘पवार’ हे आडनाव, शरद पवार यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांची रणनीती आणि राष्ट्रीय पातळीवरील वजन यामुळे पक्षाला स्थैर्य मिळू शकते. मात्र, शरद पवार यांची भाजपविरोधी भूमिका कायम आहे. बदललेल्या परिस्थितीत ते ही भूमिका कायम ठेवतील का, की वास्तववादी निर्णय घेतील, यावर बरंच काही अवलंबून आहे.
दुसरा पर्याय : पवार कुटुंबातूनच नवे नेतृत्व उभे करणे
अजित पवारांच्या जागी पक्षाचा नवा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री असा पर्याय समोर येऊ शकतो. पण पद मिळणं आणि नेतृत्व स्वीकारलं जाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अजित पवारांसारखा सर्वसमावेशक, धाक असलेला आणि कार्यकर्त्याला ‘मी आहे’ असं सांगणारा नेता सध्या पक्षात दिसत नाही. हाच या पर्यायाचा मोठा कमकुवतपणा आहे.
तिसरा पर्याय : शरद पवारांपासून अंतर ठेवून भाजपसोबत राहणे
सत्तेच्या दृष्टीने हा पर्याय तात्कालिक सुरक्षित वाटतो. मात्र, दीर्घकालीन राजकारणात यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक ओळख पुसली जाण्याचा धोका आहे. धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेवर उभ्या असलेल्या पक्षासाठी हा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो.
पर्याय आहेत, पण सक्षम पर्याय आहे का?
अजित पवारांच्या जागी कोणीही आले, तरी तो नेता केवळ खुर्चीवर बसून चालणार नाही. अजित पवार यांची खरी ताकद त्यांच्या वैयक्तिक संपर्कात होती. जातीपातीपलीकडे जाऊन त्यांनी तरुणांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना जोडले. मंत्रालयातील सहा मजल्यांतून गावागावांत कामे करून देण्याची क्षमता त्यांनी निर्माण केली होती. त्यामुळेच कार्यकर्त्यांना वाटायचं – सत्ता आपल्या हातात आहे.आज हीच भावना हरवली आहे.
फडणवीसांची कोंडी आणि सत्तासंतुलन
अजित पवार यांचे निधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठी हानी आहे. महायुतीमध्ये अजित पवार हे ‘बॅलन्स फॅक्टर’ होते. भाजपला धर्मनिरपेक्ष चेहरा देणारे, आणि तीन पक्षांचे सरकार प्रत्यक्षात चालवणारे ते महत्त्वाचे दुवे होते.
आता उपमुख्यमंत्रीपदावर येणारा नवा चेहरा फडणवीस यांच्याशी कसा जुळतो, यावर सरकारमधील अंतर्गत सत्तासंतुलन ठरणार आहे. बहुमत भक्कम आहे, सरकार पडणार नाही; पण सरकारमधील एक उमदे सरकार हरपले आहे.
सुप्रिया सुळे आणि पवार घराण्याभोवतीचे प्रश्न
सुप्रिया सुळे यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतली, तर त्या राज्याच्या सत्ताकेंद्रात सक्रिय होतील का, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. लोकसभेत बसून राज्यातील आमदार आणि कार्यकर्त्यांची मंत्रालयीन कामे कशी मार्गी लागणार? राज्यात येऊन त्या उपमुख्यमंत्री होतील का? मुळात त्यांची तशी इच्छा आहे का?
पार्थ पवार आणि जय पवार अजून राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत. सुनेत्राताई पवार राज्यभर फिरून संघटन उभं करू शकतील का, याबाबतही साशंकता आहे. छगन भुजबळ आजारातून सावरत आहेत, तर जयंत पाटील यांना दोन्ही गटांत सर्वमान्य नेतृत्व म्हणून स्वीकारलं जाईल का, हेही अनिश्चित आहे.
कार्यकर्त्यांची अस्वस्थता आणि सत्तेची गरज
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर अनेक नेते अक्षरशः हतबल झालेले दिसले. “आता कोणाकडे पाहून राजकारण करायचं?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
कार्यकर्त्यांना ताकद सत्तेमधून मिळते. मंत्रालयातून एक फोन, एक सही, एक फाइल पुढे जाणं—यातूनच स्थानिक राजकारण जिवंत राहतं. जर ही ताकद पक्षातून मिळाली नाही, तर नेते पर्याय शोधतात, हा इतिहास आहे. हीच अस्वस्थता आज दोन्ही राष्ट्रवादी गटांत दिसते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ थांबलेली नाही; ती दिशाहीन अवस्थेत फिरत आहे. ही दिशा केवळ सत्तेच्या गणितावर नाही, तर विश्वासार्ह नेतृत्व, भावनिक बांधिलकी आणि प्रशासकीय पकड यावर ठरणार आहे.
एकछत्री नेतृत्त्वावर उभ्या असलेल्या प्रादेशिक पक्षांसमोर असा संक्रमणकाळ नेहमीच कठीण असतो. आता प्रश्न एवढाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आपली ओळख जपून सत्ता मिळवते, की सत्तेसाठी आपली ओळख नव्याने घडवते?
याच निर्णयावर महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढील अस्तित्व आणि प्रभाव अवलंबून असणार आहे.
– डॉ. प्रवीण डबली
वरिष्ठ पत्रकार
9422125656/7020343428



