परमेश्वराने मानवाला दिलेले जीवन किती सुंदर आहे, असे आपण एका बाजूला म्हणतो; पण त्याच वेळी हेच जीवन संघर्ष, यातना आणि दुःखांनी किती खोलवर व्यापलेले आहे, याचे भानही आपल्याला येते. हीच जगण्यातील भयावह विसंगती,जी मनाला अस्वस्थ करते आणि तरीही माणसाला घडवत राहते. कुणी भाकरीच्या एका तुकड्यासाठी जीवाचे रान करतो, तर कुणी गर्भश्रीमंतीच्या झगमगाटातही जगण्यातील उणीवांचा शोध घेत सैरभैर होतो. या दोघांच्याही वेदना त्यांच्या त्यांच्या पातळीवर समतुल्यच असतात. मात्र या संघर्षातून मानव केवळ तग धरत नाही, तर खऱ्या अर्थाने समृद्ध होतो,कारण संघर्षच जीवनाला अर्थ देतो. याच संघर्षातून कुणाचा कणा ताठ होतो, तर कुणी संवेदनशील कवी म्हणून शब्दांच्या वाटेने समाजासमोर उभा राहतो. अशाच ग्रामीण मातीतून जन्माला आलेले कवी–लेखक म्हणजे दिगंबर जाधव.
असे म्हटले जाते की खऱ्या भारताचे समग्र दर्शन खेड्यांतूनच घडते. शेतात राबणारा शेतकरी आपल्या हाडामांसाचे मातेरं केल्याशिवाय पीक उभे करू शकत नाही. कर्जाच्या नोटा त्याचे अख्खे आयुष्य जाळत असतात. त्या शेतात खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या स्त्रिया त्याच्या नशिबाच्या खऱ्या भागीदार असतात. स्त्रियांच्या वेदना, त्यांच्या अपूर्ण आकांक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी चाललेला अखंड संघर्ष,या साऱ्या ग्रामीण वास्तवाला अत्यंत जवळून अनुभवणारे कवी दिगंबर जाधव यांनी हे जगणे कवितांच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे. ते लिहितात,
बारमाही अन्नदात्याचं
फाटक्या लक्तराचं जिणं
तरीही जगासाठी पिकवितो
सदैव मातीतून सोनं
शेतकरी आणि समग्र ग्रामीण जीवनाचे वास्तव शब्दांत ताकदीने उभे करणाऱ्या कवी–लेखक दिगंबर जाधव यांचा जन्म अतिशय गरीब परिस्थितीतील शेतकरी कुटुंबात झाला. वडील बापूराव जाधव आणि आई गिरजाबाई बापूराव जाधव यांच्या संस्कारांतून त्यांचे बालपण घडले. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सांडस हे गाव,शेतकऱ्यांच्या अनंत यातनांचे, भोगांचे आणि अठरा विश्व दारिद्र्याचे प्रतीक—ही परिस्थिती त्यांनी अगदी जवळून पाहिली. मात्र आई-वडिलांकडून मिळालेल्या श्रमप्रतिष्ठेच्या बाळकडूने त्यांनी कधीही श्रमाची लाज बाळगली नाही. शेतावर मजूर म्हणून काम करत असतानाच सांडस येथे पहिली ते चौथी आणि पुढे तालुक्यात पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या ठाम विश्वासातून त्यांनी इतिहास आणि मराठी वाङ्मयात एम.ए. तसेच बी.एड. ही पदवी संपादन केली.
घरातील वारकरी संप्रदायाची परंपरा,भजन, कीर्तनांचा जागर,आणि लहानपणापासूनची वाचनाची आवड, यांमुळे मराठी साहित्याची गोडी त्यांच्या मनात खोलवर रुजली.
२७ जून १९९७ रोजी वारंगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. या दिवसापासून त्यांच्या जीवनात आनंदाने जसा प्रवेश केला, तसाच प्रतिभेनेही आपली चाहूल दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवत असताना, स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेल्या परिस्थितीशी प्रतिभेचा सुरेख मेळ घालत त्यांच्या कविता फुलू लागल्या. याच प्रवासातून त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘मातीतलं सोनं’ प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ८९ कविता असून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या केविलवाण्या शेतकऱ्याची काव्यगाथा त्यातून उलगडते. भोग भोगल्याशिवाय शेतकऱ्याला जगता येत नाही, हे विदारक वास्तव कवी अत्यंत प्रामाणिकपणे मांडतात.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना ते स्त्रीभावनाही तितक्याच ताकदीने शब्दबद्ध करतात. परिस्थिती आणि प्रतिभा यांच्या संघर्षातूनच कवी घडतो, हे ते आपल्या लिखाणातून अधोरेखित करतात. मानवी वेदनांना शब्दांची धार देत ते लिहितात,
कुठे होता जीव सुखी तुझे दुःख पाहून राया
भरलेल्या घरामध्ये होती कासावीस काया
‘सौभाग्याचं लेणं’ या वास्तववादी कवितेत दोन्ही किडन्या गमावलेल्या पतीसाठी पत्नी स्वतःची किडनी देते; मात्र पाच वर्षांनी तो पती मृत्युमुखी पडतो. या कवितेतील हृदयस्पर्शी ओळी त्या स्त्रीची अपरिहार्यता आणि तिचे नि:शब्द बलिदान व्यक्त करतात.
‘लक्तराचं जिणं’ या कथासंग्रहात अपत्य न झालेली पत्नी स्वतःच्या पतीला दुसरे लग्न करण्यास भाग पाडते आणि शेवटी तिचे आयुष्य कसे लक्तर होते, याचे विदारक चित्रण कवीने अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. रानपाखरू आणि आधुनिक सती सावित्री या कथांतून स्त्रीविश्वाच्या विविध भावछटा रंगवल्या आहेत.
गझल या काव्यप्रकारातही ते निष्णात असून आई-वडिलांवरील प्रेम, पती-पत्नीमधील नातेसंबंध, भाऊ–बहिणीतील स्नेह यांवर आधारित ‘लावण्यवती’ हा गझलसंग्रह त्यांनी लिहिला आहे. जगण्यातील विदारकता जितक्या ताकदीने ते मांडतात, तितक्याच तरलतेने प्रेमाचे रंगही उलगडतात. ‘तुकोबाची वारकरी’ हा अभंगसंग्रहही त्यांच्या साहित्यप्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे.
आपल्या साहित्यिक जडणघडणीत मावस भाऊ व प्रसिद्ध साहित्यिक फ. मु. शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, डॉ. जगदीश कदम, डॉ. इंद्रजीत भालेराव तसेच कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकर यांचा सदैव प्रभाव राहिल्याचे ते कृतज्ञतेने सांगतात.
३१ वर्षांचा सहाय्यक शिक्षक म्हणूनचा प्रवास उलगडताना ते अभिमानाने सांगतात की आतापर्यंत चार शाळांमध्ये त्यांनी कार्य केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त प्रतिभा ओळखून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. साहित्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून सकाळच्या परिपाठात त्यांच्या कवितांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतात, पाठांतर व सादरीकरण घडवतात, वाचलेल्या कवितांचे मर्म लिहिण्यास प्रवृत्त करतात. अशा प्रकारे वाचन–लेखन संस्कृती रुजविणारे उपक्रम ते राबवतात. आभासी माध्यमातून विविध साहित्यिकांशी विद्यार्थ्यांची भेट घडवून देतात आणि समृद्ध ग्रंथालयातून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. याच परिश्रमांचे फळ म्हणून अनेक विद्यार्थी आज कविता व लेखन करू लागले आहेत.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी ते सांस्कृतिक उपक्रम, खेळ आणि कार्यानुभव यांसारखे सृजनशील कार्यक्रम घेतात. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाण असलेला एक प्रसंग ते सांगतात—अत्यंत गरीब विद्यार्थ्याला दर शुक्रवारी भाजी खरेदीसाठी ६० रुपये देत. तो विद्यार्थी त्या पैशातून भाजी विकत घेऊन विक्री करायचा, नफा स्वतःकडे ठेवायचा आणि मुद्दल परत करायचा. आज तोच विद्यार्थी मोठा व्यापारी झाला आहे. “आज मी जो काही आहे, ते आपल्या सहकार्यामुळे,” असे तो म्हणतो, तेव्हा त्या शब्दांतच आपले सार्थक सामावल्याची भावना कवी व्यक्त करतात.
सांडस हे गुरुजींचे माहेरघर, इथेच त्यांनी कलेचे बाळकडू घेतले. त्यांच्या वडिलांना अवघे गाव ‘तात्या’ म्हणायचे. “तात्याचा मुलगा तात्याचा वारसा चालवतो,” असे मित्र भागवतराव निरगुडे अभिमानाने सांगतात. कवी फ. मु. शिंदे आणि जाधव मास्तर एकाच कुटुंबातील असल्याने संस्कारांची ही परंपरा अखंड राहिली आहे. विद्यार्थी घडवणारा आणि साहित्याला न्याय देणारा साहित्यिक अशी ओळख आज राज्यभर दिगंबर जाधव मास्तरांनी निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांचे पुरात वाहून गेलेले पीक, वादळ, स्त्रियांवरील अन्याय, हुंडाबळी यांसह सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांनी एकूण ३१९ कविता लिहिल्या आहेत. या उल्लेखनीय साहित्यिक कार्यामुळे ते केवळ विद्यार्थ्यांतच नव्हे, तर मराठवाड्यातील ग्रामीण कवी, लेखक म्हणून नावलौकिकास आले आहेत.
या कार्याची दखल घेत त्यांना साहित्यरत्न पुरस्कार (लातूर), हिंगोली जिल्हा ज्ञानरत्न पुरस्कार तसेच ग्रामीण कवितांसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन आणि राज्यस्तरीय काव्यसंमेलनांमध्ये ते निमंत्रित कवी म्हणून सहभागी होतात.
श्रमप्रतिष्ठा आणि वारकरी परंपरेच्या संस्कारांतून घडलेले कवी दिगंबर जाधव आजही आपल्या मातीशी घट्ट जोडलेले आहेत. सुट्टीच्या दिवशी ते स्वतः शेतात नांगरणी करतात,तरुणांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व कळावे आणि कार्यप्रवणतेची जाणीव व्हावी, हा त्यामागचा उदात्त हेतू. गरजू लोकांना मदत करून समाजाचे ऋण फेडण्याची भावना ते जपतात आणि हीच संवेदना त्यांच्या लेखनातून सतत झळकत राहते.
सेवानिवृत्तीनंतर विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची आणि ‘मी कसा घडलो’ हे आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा ते व्यक्त करतात.
परिस्थिती आणि प्रतिभा यांचा सुरेख मेळ घालत उंच भरारी घेतलेल्या कवी–लेखक दिगंबर जाधव यांच्या प्रतिभेच्या कळ्या अशाच फुलत राहोत आणि त्यांच्या शिक्षकी व्यक्तिमत्त्वातून विद्यार्थ्यांचे जीवन अधिक समृद्ध होत राहो,यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.




