जपानी मुलीचा तो व्हिडिओ आणि ‘मराठी’चा वार; राज ठाकरेंनी मोहन भागवतांना घरचा अहेर देत नक्की काय सुनावले?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:परकीयांना जे सहज उमजते, ते स्वकीयांना का समजत नाही? असा तिखट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एका जपानी तरुणीचा मराठी शिकतानाचा व्हिडिओ शेअर करत राज यांनी भागवतांच्या मुंबईतील वावरावरून आणि त्यांच्या मराठी अस्मितेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाचे नवे मोहोळ उठले आहे.
काय आहे ‘त्या’ व्हिडिओचे रहस्य?
राज ठाकरे यांनी एका जपानी तरुणीचा व्हिडिओ शेअर केला आहे, जी महाराष्ट्रात राहून दररोज एक नवीन मराठी शब्द शिकते आणि तो अभिमानाने बोलून दाखवते. हाच धागा पकडून राज यांनी ‘कोल्डप्ले’चा ख्रिस मार्टिन ते मुंबईतील विविध देशांचे राजदूत यांचा दाखला दिला. “परदेशी पाहुणे इथे आल्यावर इथल्या संस्कृतीचा आणि भाषेचा सन्मान करतात, मग आपल्याच माणसांना मुंबईची भाषा मराठी आहे हे सांगताना संकोच का वाटतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरसंघचालकांना थेट टोला
मोहन भागवत यांच्या मुंबईतील नुकत्याच झालेल्या दौऱ्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, सरसंघचालक मुंबईत येतात, ते स्वतः मराठी आहेत, तरीही त्यांना इथल्या जनतेशी संवाद साधताना मराठीत बोलावं असं का वाटलं नाही? “मुंबईत अनेक भाषा आहेत, असं म्हणणाऱ्यांना ही जपानी मुलगी आरसा दाखवतेय,” अशा शब्दांत त्यांनी भागवतांच्या भूमिकेवर टीका केली.
संघाच्याच लोकांचा दाखला आणि सुदर्शनजींची आठवण
राज यांनी यावेळी एक खळबळजनक खुलासा केला. ते म्हणाले, “मला संघाच्याच काही लोकांनी सांगितले की, माजी सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म रायपूरमध्ये झाला असला, तरी त्यांनी आपल्या मातृभाषेचा (कन्नड) कधी विसर पडू दिला नाही. ते कर्नाटकात गेल्यावर आवर्जून कन्नडमध्ये बोलायचे.” या उदाहरणाद्वारे राज यांनी भागवत मराठी असूनही मराठीचा वापर टाळत असल्याकडे लक्ष वेधले.
मराठी भाषिकांना मोठे आवाहन
केवळ टीका करून न थांबता राज ठाकरे यांनी मराठी बांधवांना एक कानमंत्रही दिला आहे. “परदेशी लोक आपल्या भाषेचा सन्मान करतातच, पण इथल्या मूठभर स्वकीयांना मराठीत बोलायला भाग पाडण्यासाठी आपली भाषा ‘ज्ञानाची’ आणि ‘अर्थार्जनाची’ (पैसे मिळवून देणारी) बनवूया,” असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर आता संघ परिवार किंवा भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
Deepak Kaitke




