टॉप स्टोरी महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या एकत्र सभेवर न्यायालयीन सावट? ‘ध्वनी प्रदूषण’च्या नावाखाली सदावर्तेंची थेट कोर्टात धडक

विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शिवतीर्थावर होऊ घातलेल्या ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक सभेआधीच वादाचे ढग दाटून आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेविरोधात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात जाण्याची तयारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“मी मुंबईचा एक सामान्य मतदार आहे, म्हणूनच हा आवाज उठवतोय,” असं म्हणत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर थेट आरोपांची तोफ डागली. “कायद्याचं उल्लंघन करणारेच इतरांना कायद्याचे धडे देतात,” असा घणाघात करत त्यांनी ११ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे होणाऱ्या सभेविरोधात औपचारिक तक्रार केल्याचं जाहीर केलं.
‘ध्वनी प्रदूषण’चा मुद्दा—थेट कोर्ट अवमानाचा आरोप
राज ठाकरे पर्यावरणाबाबत भूमिका मांडतात, मात्र “एक बोट दुसऱ्यांकडे दाखवताना चार बोटं स्वतःकडे वळलेली असतात,” असा टोला लगावत सदावर्तेंनी सभांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर बोट ठेवलं.
उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट आरोप केला की, “त्या ठिकाणी राजकीय पक्षांना हक्काने सभा घेण्याचा अधिकार दिलेला नाही. अशा परिस्थितीत सभा घेणं म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे.”
‘कायदा सगळ्यांसाठी समान’—ठाकरे बंधूंनाही अपवाद नाही
“कायदा पाळलाच पाहिजे. ठाकरे बंधू असोत वा इतर कोणताही पक्ष,” असा ठाम पवित्रा घेत सदावर्तेंनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं. “आता जे काही म्हणायचं आहे, ते कोर्टातच सांगावं लागेल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
“क्रीडा महोत्सव असो वा ६ डिसेंबर—नियम सगळ्यांसाठीच. जैसी करनी, वैसी भरणी,” असं म्हणत त्यांनी थेट “राज ठाकरे अपने गिरबान में झांक कर देखो—हा संघ भारत आहे,” अशा शब्दांत राज ठाकरेंवर हल्ला चढवला.
अण्णामलाईंच्या विधानाला पाठिंबा, नवा राजकीय मसाला
या वादाला आणखी राजकीय धार देताना सदावर्तेंनी तामीळनाडू भाजपाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या विधानालाही दुजोरा दिला. “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जागतिक केंद्र आहे. तिला तुकड्यांत पाहता येत नाही,” असं म्हणत बाहेरील लोकांविरोधातील भूमिकेवरही त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
इतकंच नाही, तर “लवकरच धनंजय मुंडे मंत्री झाले पाहिजेत—ही बहुजन समाजाची इच्छा आहे,” असं विधान करून त्यांनी राजकीय चर्चेला आणखी पेटवून दिलं.
११ जानेवारी—शक्तिप्रदर्शन की न्यायालयीन संघर्ष?
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण, दोन्ही ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागलं आहे.
११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या सभेत ठाकरे बंधू नेमका कोणता राजकीय संदेश देणार—आणि त्याआधी न्यायालयीन अडथळा उभा राहणार का—याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
एकीकडे ठाकरे बंधूंच्या ऐक्याचं शक्तिप्रदर्शन, तर दुसरीकडे ध्वनी प्रदूषणच्या मुद्द्यावर थेट न्यायालयात जाण्याची तयारी—या संघर्षातूनच मुंबईच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार, हे मात्र नक्की.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *