मुंबई

ठाणे-कल्याणचा ‘ग्लोबल’ अवतार; ४८ हजार कोटींच्या महायोजनेमुळे मुंबईच्या प्रवेशद्वाराचे भाग्य पालटणार!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकणारा एक क्रांतिकारी आराखडा आता प्रत्यक्षात उतरणार असून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. एमएमआरडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल ४८ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली असून, यामुळे या दोन्ही शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाणे शहराला भविष्यातील ‘मोबिलिटी हब’ म्हणून जागतिक दर्जाची ओळख मिळणार असून, कल्याण हे प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या महाकाय गुंतवणुकीमुळे केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
ठाणे शहरासाठी या अर्थसंकल्पात १२ ते १३ हजार कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः १८ हजार ८३८ कोटींच्या ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२६-२७ या वर्षाकरिता ३ हजार कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबई-ठाण्यातील प्रवासाचे गणितच बदलून जाणार आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो ४, ४-ए आणि मेट्रो ६ च्या जाळ्यामुळे ठाणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार असून कोस्टल रोड आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. केवळ रस्तेच नाही, तर रायलादेवी आणि मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासह कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठीही कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली परिसराचा भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून विस्तार करण्यासाठी अडीच ते साडेतीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण रिंग रोडच्या कामाला वेग देऊन शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो ५, उल्हासनगर विस्तार ५-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ मुळे कल्याण हे मुंबई महानगरातील सर्वात मोठे ‘ट्रान्झिट हब’ बनणार आहे. तसेच, ऐरोली-काटई नाका प्रकल्पामुळे नवी मुंबईशी होणारा संपर्क अधिक वेगवान होईल. मेट्रो सोबतच पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी आणि मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीचा एकत्रित आराखडा राबवून एमएमआर क्षेत्रातील प्रवास हायटेक केला जाणार आहे. नागरिकांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी ‘पोशीर’ आणि ‘शिलार’ या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *