प्रवीण कोकाटे, दिनकर पाटील, संजय राऊत, श्रीकृष्ण आवारे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव
नाशिक । येथूल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या चार सायकलिस्टने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत “हम फिट तो इंडिया फिट” हा नारा घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी अशी सुमारे ३८०० कि.मी.ची भव्य सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
या मोहिमेची सुरुवात दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०६ ४५ वा. लाल चौक, श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथून करण्यात आली. चार सायक्लिस्ट यांनी अखंड सायकलिंग करत हा प्रवास पार पडला. ही मोहीम दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ वा. कन्याकुमारी झिरो पॉईंट (एनएच-४४ समाप्ती बिंदू) येथे यशस्वीरित्या पूर्ण झाली. एकूण ११ दिवस, १० तास, ०५ मिनिटे इतक्या विक्रमी वेळेत ही ऐतिहासिक राईड पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेतील सायक्लिस्ट सदस्य प्रवीण कोकाटे (सेवानिवृत्त सहा पोलीस उपनिरीक्षक), दिनकर पाटील (सेवानिवृत्त सैनिक), संजय राऊत (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक), श्रीकृष्ण आवारे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) या सर्वांनी आपल्या जिद्द, शिस्त, त्याग आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेतून ही सायकल राईड पूर्ण केली. या प्रवासादरम्यान जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमधून विविध शहरातुन सायकलिंग करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश केवळ विक्रम प्रस्थापित करणे नव्हता, तर देशभरातील युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती, त्याग, अनुशासन या त्रिसूत्री संकल्पनेचा संदेश पोहोचवणे हा होता. “हम फिट तो इंडिया फिट” या घोषवाक्याद्वारे जागोजागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आरोग्य, फिटनेस आणि राष्ट्रीय एकात्मतेबाबत प्रबोधन करण्यात आले.
भावना आणि अनुभव
काश्मीरच्या थंडगार वातावरणातून सुरू झालेला हा प्रवास कन्याकुमारीच्या उष्ण, दमट वातावरणात पूर्ण झाला. हा केवळ सायकल प्रवास नव्हता, तर तो स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा, शिस्त आणि सातत्याची परीक्षा देणारा जिद्दीचा प्रवास होता. लांब महामार्ग, चढ-उतार, वारा, ऊन आणि थकवा यावर मात करत प्रत्येक राज्याची सीमा पार करताना भारताच्या विविधतेतील एकतेचा अनुभव अधिक दृढ झाला. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे संस्थापक हरीश बैजल (आयपीएस) यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि नियोजनामुळे हा ऐतिहासिक विक्रम शक्य झाला. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनने देशासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. स्वप्न बघा… धाडसाने त्याचा पाठलाग करा…रस्ते कितीही लांब असले तरी पेडल मारत राहिलात, तर मंजिल नक्की गाठता येते!
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन




