येत्या ६ फेब्रुवारीला पार पडणार निवडणूक प्रक्रिया
नाशिक । येथील महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) निवडणूक होत आहे. सभागृहात बहुमतापेक्षाही अधिक म्हणजे ७२ सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांच्या तर उपमहापौरपदासाठी मच्छिन्द्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
नाशिकचे महापौर यंदा सर्वसाधारण महिला गटासाठी असल्याने सुरुवातीपासूनच हिमगौरी आडके यांच्या नावाची चर्चा होती. इतरही नावे चर्चेत असली तरी मोठा राजकीय वारसा लाभलेल्या आडके यांना पक्षाने लिफ्ट दिली आहे.
हिमगौरी आडके या माजीमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते स्व. डॉ. दौलतराव आहेर यांची पुतणी, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची चुलत बहीण, तथा बाळासाहेब आहेर यांची कन्या आहे. हिमगौरी यांचे पिताश्री हेही नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती होते तर त्यांच्या मातोश्री प्रा. शोभना आहेर या उपमहापौर होत्या. हिमगौरी यांनीही गेल्या पंचवार्षिकमध्ये स्थायी समितीचे सभापतिपद भूषविले आहे. ज्या वेळेला नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले त्याचवेळेस हिमगौरी आडके याच महापौरपदी विराजमान होतील अशी गटकळ बांधली जात होती.
उपमहापौरपदासाठीही अनेक नावे चर्चेत होती. अखेर माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिन्द्र सानप यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले. मच्छिन्द्र सानप यांची ही दुसरी टर्म आहे. मच्छिन्द्र सानप यांचे पिताश्री बाळासाहेब सानप यांनी नाशिक शहराचे उपमहापौर आणि महापौर अशी दोन्ही पदे भूषविली आहेत. नवनिर्वाचित महापौर-उपमहापौर यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार असला तरी पक्षाने सव्वा वर्षाचे महापौर-उपमहापौरपद करण्याची तयारी चालविली असल्याची खमंग चर्चा आहे. तसे झाले तर सातव्या पंचवार्षिकमध्ये चार महापौर व चार उपमहापौर होऊन आठ जणांना संधी मिळू शकेल.
मंगळवारी (दि. ३) महापौर-उपमहापौर पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी हिमगौरी आडके, मच्छिन्द्र सानप यांच्या समवेत आमदार राहुल ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह पदाधिकारी, नेते आणि भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिमगौरी आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.
निवडणुकीची प्रक्रिया औपचारिक
महापालिका सभागृहात भाजपचे सर्वाधिक ७२ सदस्य आहेत. ही संख्या बहुमताच्या आकड्यापेक्षाही अधिक असल्याने भाजपचे महापौर-उपमहापौर होतील यात शंका नाही. दि६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम महापौरांची निवड होईल. त्यानंतर नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौरांची निवड होईल.




