माणूसपणाची पाऊलवाट

नीतीमूल्यांशी तडजोड न करणाऱ्या प्रामाणिक ख्यातनाम वकील शर्वरी तुपकर

वकिली पेशाचं बाळकडू घरातूनच मिळाल्याने वकिल या व्यवसायाभोवती जितकी प्रतिष्ठेची वलयं असतात, तेवढीच त्यामागील नवनवीन आव्हाने, संघर्ष, रात्रीचा दिवस करून अखंड घ्यावी लागणारी मेहनत, अभ्यास, संशोधन, समोरील कठीण व्यक्तीशी करावा लागणारा संयमित पण तेवढाच तर्कशुद्ध संवाद या कसोटींवर शर्वरी तुपकर खऱ्या उतरल्या आहेत.

एवढेच नाही तर दृढ नीतिमान, प्रामाणिक, मूल्यांशी तडजोड न करणाऱ्या आणि कधीही मॅनेज न होणाऱ्या वकील म्हणून बुलढाणा जिल्ह्यात त्या ख्यातनाम झालेल्या आहेत. त्यांचा प्रवास जेवढा खडतर आहे तेवढाच रोमहर्षक आणि जिद्दीची पराकाष्टा करणारा आहे.
सिविल केसेस, कौटुंबिक वाद आणि विशेषतः अँटी करप्शन आणि क्रिमिनल च्या केसेस यशस्वीपणे हाताळणारे लीडिंग प्रॅक्टिशनर म्हणून बुलढाणा जिल्ह्यात मोठं प्रस्थ असलेले वडील अशोक सावजी सदैव बुलढाणा जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असलेले वकील आहेत. बुलढाणा जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न, रस्ते, नगरपालिकेची अरेरावी, कष्टकऱ्यांवर होणारा अन्याय यासाठी लोकांना एकत्रित करणे, सामाजिक कार्यकर्त्यांवर सरकारने केस केल्यास त्यांच्या बाजूने एकही पैसा न घेता किंवा कोणत्याही खर्चाची अपेक्षा न बाळगता त्यांना न्याय मिळवून देणे यासाठी सदैव प्रयत्नशील धडपडणारे वडील यांच्या कडक आणि मूल्यधिष्ठित तालमीत शर्वरी तुपकर जेवढ्या वकील म्हणून घडल्या तेवढ्याच त्या एक संवेदनशील सामाजिक समस्येची जाण असणाऱ्या व्यक्ती म्हणून सुद्धा घडल्या. वडिलांप्रमाणेच स्वच्छ प्रतिमा असलेल्या वकील म्हणून बुलढाणा मध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे.
त्या आपल्या जीवनातील विसंगती सांगतात की मला जरी वडिलांनी एखाद्या मुलाप्रमाणे वाढविले असले काही बंधने माझ्यावर घातली नसली तरी, आजोबा आणि वडील दोघेही वकील असले तरी वकिलीची परंपरा मात्र आपल्या मुलीने चालवू नये असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासूनच वकील होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या शर्वरी तुपकर यांनी घरातून असलेल्या प्रचंड विरोधाला न जुमानता वकील होण्याचा निर्णय घेतला.
नागपूरला त्यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण करीत असतानाच वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये त्या प्रॅक्टिस करू लागल्या. वडिलांकडे येणाऱ्या सिविल केसेस, कौटुंबिक केसेस, महसूल विषयक केसेस, क्रिमिनल आणि अँटी करप्शन च्या केसेस त्या हाताळू लागल्या. यामध्ये माहिती घेणे, ड्राफ्टिंग करणे, संबंधित फायलिंग करणे यासारखी कामे त्या करू लागल्या आणि हळूहळू त्या निष्णात होऊ लागल्या.
एका टप्प्यानंतर वडिल अँटी करप्शन आणि क्रिमिनलच्याच केसेस बघू लागले त्यामुळे सिविल केसेस, फॅमिली केसेस, महसूल विषयक वाद आपसुकच शर्वरी यांच्याकडे आल्या.
आणि हळूहळू त्या आपल्या कामात वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये निष्णात होऊ लागल्या. सिव्हिल केसेस हाताळण्यात त्यांनी हातखंडा निर्माण केला.
त्या एक किस्सा सांगतात की वडिलांकडे एक अँटी करप्शन ची केस आली होती पण त्यांना दुसरीकडे ट्रायल साठी जायचे होते. तेव्हा वडिलांनी या अँटीकरप्शन केसची जबाबदारी शर्वरी तुपकर यांच्याकडे सोपविली. पण जेव्हा त्या आरोपीला कळले की ही केस अशोक सावजी हाताळत नाही आहेत तर त्यांची मुलगी हाताळणार आहे तेव्हा त्या व्यक्तीने अँटी करप्शन चे ज्ञानही नसणाऱ्या व्यक्तीला ही केस सोपवली. या घटनेमुळे शर्वरी या हादरून गेल्या आणि आपल्या महिला असल्यामुळे आपल्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे त्यांना वाटले. महिला म्हणून दुय्यम वागणूक मिळण्याचे अनेक प्रसंग त्यांचे समोर आले पण आपल्या कर्तुत्वाने त्यांनी आपल्यातील महिला म्हणून येणाऱ्या मर्यादांवर मात केली.
आपल्या उमेदीच्या काळातच शेतकरी, तरुण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सदैव उग्र आणि प्रखर आंदोलन करणारे सक्रिय कार्यकर्ते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनांच्या केसेस च्या अनुषंगाने त्या दोघांची ओळखी झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्नच या अटीवर झाले की मी सदैव शेतकरी आंदोलनामध्ये कार्यरत राहील आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हि तुला सांभाळावी लागेल. पण कशाचीही तमा न बाळगता आणि त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून काम करेल असे आश्वासन देत त्या चतुर्भुज झाल्या.
त्या सांगतात खऱ्या अर्थाने मी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाली ती लग्नानंतर. शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यांच्या न्यायासाठी धरणे आंदोलन, महिला मिळावे, कष्टकरी आणि तरुणांच्या न्यायासाठी हक्काच्या लढाया या सर्व सामाजिक कार्यांमध्ये त्या आपल्या पतीसोबत सहभाग दर्शवितानाच या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाजूने त्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला झोकून देतात.
आपल्या व्यवसायामध्ये सुरुवातीला महिला म्हणून मिळालेली दुय्यम वागणूक याचा दूरगामी परिणाम झालेल्या शर्वरी तुपकर यांनी गर्भनिदान परीक्षण करणाऱ्या केंद्रामध्ये स्टिंग ऑपरेशन केले आणि गरोदर अवस्थेतही जीव धोक्यात घालून डॉक्टर उमेश लोंढे यांना तुरुंगात टाकले.‌ हा अनुभव फारच थरारक असा आहे.‌ असे त्या म्हणाल्या. लग्नानंतर पाच महिन्याच्या गरोदर असताना त्यांच्या परिचित असलेल्या वर्षाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी लिंगनिदान केंद्राचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरविले. टी.व्ही. नाईन च्या रिपोर्टर त्या आणि जाऊ म्हणून आलेल्या शैलाताई या तिघीजणी मुंबई येथे डॉक्टर उमेश लोंढे यांच्या केंद्रात गेल्या. लिंगनिदान परीक्षण करण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना गाडीतून 15 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांच्याजवळ केवळ एक रेकॉर्डर होता जो त्यांनी छातीजवळ ठेवला होता. त्या ठिकाणी डॉक्टर, त्या आणि सोनोग्राफी करणारे डॉक्टर असे तिघेच जण होते. एवढ्या वेळात त्यांनी पुरावा गोळा केला आणि कशाबशा तेथून निसटल्या. त्यांची मेडिकल कंडिशन नाजूक असतानाही अगदी जीवावर उदार होऊन त्यांनी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या डॉक्टरांना गजाआड केले. त्या मोठ्या अभिमानाने सांगतात की मी अशा चार केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे.
आपले जीवन संपूर्णपणे शेतकरी आंदोलनाला वाहिलेल्या पतीवर आलेला एक अतिप्रसंग आणि एक पत्नी आणि सक्षम वकील म्हणून त्यांची केलेली सुटका याचा एक हृदय द्रावक प्रसंग त्या सांगतात. शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळावा म्हणून त्यांच्या पतीने आत्मदहनाची घोषणा केली होती. पत्रकार परिषद घेतली आणि ते गायब झाले. जेव्हा ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या तेव्हा तुपकर यांना कळले की त्यांचे पती आत्मदहन करणार आहेत. त्यांच्या घराभोवती पोलिसांनी गराडा घातला, फोन टॅपिंग होत होते, पोलीस वारंवार त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवत होते. पण त्या म्हणाल्या मला याबद्दल काहीही माहित नाही ते जर म्हणत आहे की ते आत्मदहन करणार आहेत तर ते नक्की करणार.
आत्मदहनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या पतीचा फोन आला की तुम्ही कलेक्टर ऑफिस कडे या. कलेक्टर ऑफिसच्या अलीकडील चौकामध्ये पोलिसाच्या वेशात त्यांचे पती आले आणि स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाची घोषणा करू लागले. सर्वत्र ओरड सुरू झाली. त्यांच्या हातातून माचिसची काडी घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत होते पण ते बधत नव्हते. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी तेथील खासदारांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि लाठीचार्ज सुरू झाला.‌ 35 लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि तुरुंगात डांबण्यात आले. यावेळेस माझ्यावरही लाठी हल्ला झाला असे त्या म्हणाल्या. आता तुरुंगात असलेल्या पतीची बेल करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आली. एक पत्नी आता वकील म्हणून पतीच्या सुटकेसाठी स्वतःचे कौशल्य पणाला लावणार होती. हे फार मोठे आव्हानही होते आणि तेवढेच दडपण ही होते. पण पण वडिलांच्या तालमीत तयार झालेली मी या दोघांचा सुवर्ण मध्ये साधला आणि हीटिंग अर्ग्युमेंट करत मीही केस जिंकली. ही जिंकलेली लढाई माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आव्हानात्मक आणि तेवढीच कौशल्यांची परीक्षा घेणारी ठरली असे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. पती सदैव आंदोलनात आणि तुरुंगात असतात त्यांच्या प्रत्येक केसेस मी तेवढ्याच निष्पक्षपणे लढते.‌ माझ्यातील ही प्रामाणिकता, लढाववृत्ती, आणि नीतिमत्ता यामुळे विरोधी पक्ष सुद्धा ही कधीच मॅनेज होणार नाही या विश्वासाने माझ्याकडे आपली केस घेऊन येतात. आतापर्यंतच्या 22 वर्षांच्या काळात अनेक सिविल केसेस, फॅमिली केसेस, महसूल विषयक वाद लढवल्या आहेत पण आता अँटी करप्शन च्या केसेस आणि क्रिमिनल च्या केसेस लढवत सिव्हिल केसेस लढणाऱ्या वकील म्हणून माझ्यावर जो शिक्का बसला होता तो मी बऱ्यापैकी पुसला आहे असे त्या म्हणतात.‌
त्यांचे पती रविकांत तुपकर असे म्हणतात की मी तुरुंगाची लढाई लढत असताना बाहेरील लढाई माझी पत्नी लढते आणि सदैव माझ्या आंदोलनात पाठराखीण असलेली माझी पत्नी माझी खरी ताकद आहे
असे म्हणतात की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एका निर्दोष व्यक्तीवर अन्याय होता कामा नये. याच जबाबदारीचे भान सदैव ठेवत, भावना आणि बौद्धिक तर्क यात संतुलन साधत आपल्या वडिलांची स्वच्छ, नीतिमान, प्रामाणिक आणि तडजोड न करणारी परंपरा त्या राखतच नाही आहेत तर त्यात त्यांनी पराकोटीचे यश प्राप्त केले आहे. आपल्यातील महिला म्हणून येणाऱ्या मर्यादांवर मात करत त्यांनी बुलढाण्याच्या कधीही तडजोड न करणाऱ्या वकील म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.
आपल्या पतीच्या आंदोलनांमध्ये खांद्याला खांदा लावून सहकार्य करून हक्कासाठी लढणाऱ्या हक्कांना काम प्राप्त करून द्यायचे आहे. पतीच्या पुढील लोकसभा जिंकण्याच्या मार्गाची तयारी करायची आहे असे त्या म्हणाल्या.
एक कणखर, स्वच्छ, नीतिमान प्रामाणिक वकील म्हणून शर्वरी तुपकर यांचा प्रवास सदैव यशाच्या शिखरावर चालो यासाठी आमच्या शुभेच्छा.

एड.शर्वरी तुपकर संपर्क क्रमांक
735097 5086

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *