नाव – अथर्व चतुर्वेदी
शिक्षण – बारावी पास
वयोमान – फक्त १९
स्थळ – सर्वोच्च न्यायालय आणि समोर भारताचे मुख्य सरन्यायाधीश लक्ष्मी कांत
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अनेक नामवंत वकील आपल्या केसचा नंबर येण्याची वाट पाहत होते. सरन्यायाधीश लक्ष्मीकांत यांच्यासमोर एका याचिकेवर ऑनलाईन सुनावणी सुरू होती. याचिका कर्ता सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना, ‘मला माझी बाजू मांडण्यासाठी फक्त दहा मिनिटांची संधी द्या…’ अशी विनंती केली जाते. वकिलीचे कोणतेही प्रशिक्षण नसलेला अथर्व चतुर्वेदी नावाचा अवघ्या १९ वर्षाचा तरुण आपल्या शिक्षणाची कैफियत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांसमोर मांडतो. एखाद्या कसलेल्या वकिलालाही लाजवेल अशा पद्धतीने मुद्देसूदरीत्या आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची मांडणी करून शिक्षण व्यवस्थेत असलेल्या प्रशासकीय त्रुटी न्यायालयाच्या लक्षात आणून देतो आणि न्यायदानाचे आवाहन करतो. पुढच्या काही क्षणातच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो. तो म्हणजे, सर्वोच्च न्यायालय राज्य सरकार आणि नॅशनल मेडिकल कौन्सिल म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला त्वरित अथर्व चतुर्वेदी याला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय जारी करते. आपल्या दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर सुयोग्य प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. फक्त गरज असते ती आलेल्या प्रसंगांना संयमाने आणि खंबीरपणे तोंड देत सामोरे जाण्याची, हेच या घटनेतून दिसून आले आहे.
अथर्व चतुर्वेदी हा जबलपूरचा रहिवासी आहे. त्याने नीट परीक्षा दोनवेळा पास केली आहे. नीट परीक्षेत त्याला 530 गुण मिळाले होते. त्याप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच इडब्लूएस मधून प्रवेश मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र मध्यप्रदेश सरकारने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ई डब्ल्यू एस आरक्षणाबाबत स्पष्ट धोरण आखलेले नाही. त्यामुळे त्याचे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न भंग होण्याची वेळ आली होती. अथर्वने बारावीत असताना गणित आणि जीवशास्त्र हे दोन्ही विषय घेतले असल्यामुळे त्याची निवड तेथील एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इंजीनियरिंग साठी झाली होती. परंतु त्याला डॉक्टर व्हायचे होते म्हणून त्याने तेथील उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र उच्च न्यायालयानेही इ डब्ल्यू एस आरक्षणाबाबत सुस्पष्टता नसल्यामुळे अथर्वची मागणी अमान्य केली. मात्र तेथील न्यायाधीशांनी तुम्ही डॉक्टर होण्यापेक्षा वकील व्हा. वकिली व्यवसायात तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत. अशी शाबासकीची थापही दिली.
या ठिकाणी अथर्वच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने शांतपणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले असते. मात्र डॉक्टर होण्याच्या जिद्दीमुळे तो गप्प बसला नाही. त्याने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एमबीबीएस प्रवेशासाठी असलेल्या सर्व कसोट्या मी पार केलेल्या आहेत. माझ्याकडे त्यासाठी लागणारे गुण सुद्धा आहेत, त्यामुळे एमबीबीएस ला प्रवेश मिळणे हा माझा हक्क आहे. एका विद्यार्थ्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून माझ्या शिक्षणाचे द्वार खुले करावे, अशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना म्हणजेच सरन्यायाधीश लक्ष्मी कांत यांना त्याने विनंती केली. त्याच्या युक्ती वादामुळे सर्वोच्च न्यायालय निव्वळ प्रभावितच झाले नाही तर न्यायालयाने आपल्या अखत्यारीतील कलम 142 चा वापर करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला आणि मध्य प्रदेशच्या सरकारला इ डब्ल्यू एस प्रवर्गातील सर्व पात्र उमेदवारांना सात दिवसाच्या आत प्रवेश मिळायला हवा आणि त्यांना कॉलेजचे वाटप करण्यात यावे असे स्पष्ट आदेश दिले. वडील पेशाने वकील असल्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत तो पाहत होता. जीवशास्त्रात रमणाऱ्या अथर्वने जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी संविधानातील कलमांचाही अभ्यास केला. सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन झालेल्या सुनावणीत भक्कमपणे आपली बाजूही मांडली आणि निव्वळ स्वतःलाच नाही तर त्याच्याप्रमाणे इतरही वंचित राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही त्यांनी न्याय मिळवून दिला.
निव्वळ धोरण स्पष्टता नसल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना आजही आपल्या आवडीच्या शैक्षणिक शाखेत प्रवेश घेता येत नाही. ज्ञानदाना ऐवजी निव्वळ नफा कमवण्याचे साधन म्हणून या क्षेत्राकडे पाहणाऱ्या शिक्षण सम्राटांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसलेली आहे. तरीही अथर्व चतुर्वेदी या विद्यार्थ्याने आपल्या जिद्दीच्या बळावर दिलेला हा लढा साधासुधा नव्हता. रिल्स च्या दुनियेत वावरणाऱ्या आजच्या तरुणाईने यापासून अवश्य बोध घ्यायला हवा आणि आपल्यातील सुप्त गुणांचा शोध घ्यायला हवा. शेवटी इतकेच म्हणायचे वाटते की,
खडतर अवघड वाटही
प्रयत्नाने होते पार…
इच्छा शक्तीच्या जोरावर
नशिबाचेही उघडते दार…
पंखात बळ जिद्दीचे,
घे तू पुन्हा भरारी…
दाही दिशात घुमू दे
तव यशाची तुतारी…
गजानन तुपे
निवासी संपादक
दैनिक महासागर, मुंबई
gajanantupe2@gmail.com




