भाजप महायुतीतून युवा नेते परेश ठाकूर, ऍड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर
शेकाप काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे व उबाठा गटातून नितीन गावंड
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर यांच्या निवडीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आज (दि. ०६ मार्च )स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितींच्या सदस्यांची निवड झाली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडी संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून महापौर नितीन पाटील यांनी काम पाहिले. या सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, सचिव नानासाहेब कामठे यांच्यासह नगसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
महापालिकेत भाजप महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाल्याने त्यांना ५ स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली. तर शेकाप-काँग्रेस गट व उबाठा गटाला प्रत्येकी एक पद मिळाले. त्यानुसार स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहाचा दांडगा अनुभव असलेले युवा नेते परेश ठाकूर, ऍड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर यांची तर शेकाप-काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे व उबाठा गटातून नितीन गावंड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संख्याबळानुसार स्थायी समिती आणि महिला व बाल कल्याण समितीमध्ये महायुतीला १२, शेकाप काँग्रेस गटाला तीन तर उबाठा गटाला एक सदस्यपद ग्राह्य झाले. त्यामध्ये भाजप महायुतीकडून प्रवीण पाटील, मधू पाटील, समीर कदम, बबन मुकादम, रविंद्र भगत, विजय खानावकर, हेमलता गोवारी, रविंद्र जोशी, राजेश्री वावेकर, ऍड. मनोज भुजबळ, रुचिता लोंढे आणि अजय बहिरा, शेकाप कॉग्रेस गटाचे अरविंद म्हात्रे, हरेश केणी, तुषार पाटील व उबाठा गटातून प्रिया गोवारी यांची निवड झाली आहे. महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजप महायुतीमधून लीना म्हात्रे, अनिता पाटील, सोनल नवघरे, बायजा बारगजे, प्रतिभा भोईर, सरस्वती काथारा, शिला भगत, कुसुम पाटील, अस्मिता घरत, ममता म्हात्रे, रुचिता लोंढे, प्रियंका कांडपिळे, शेकाप काँग्रेस गटातून योगिता फडके, मनिषा म्हात्रे, अर्चना भोईर तर उबाठा गटातील मेघना घाडगे यांची निवड झाली आहे.
महाविकास आघाडीतून लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाने फारकत घेतल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद आणि बिघाडीचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड विशेष चर्चेचा विषय ठरली. सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाकडून विमानतळाच्या नामकरणासंदर्भात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला मात्र याच विरोधी पक्षाने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला कडाडून विरोध केला होता. दिबांच्या नावासाठी झालेल्या लढ्यात सहभागी झाले नाहीत याचा जाणीवपूर्वक विसर त्यांना पडला होता. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात स्वतःचे हसे करून घेतले.
त्याचबरोबरीने सभेच्या विषय पत्रिका नुसार कामकाज सुरु करताना शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी मध्येच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभागृहनेता, विरोधी पक्षनेता निवडीबद्दल नियमाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिवांनी कायद्याच्या बाबी अधोरेखित करून विषय पत्रिका योग्य असल्याचे नमूद केले. यावेळी सभागृहाच्या कामकाजात नेहमीच विरोधी भूमिका घेणाऱ्या अरविंद म्हात्रे यांच्या भूमिकेवर महापौर नितीन पाटील यांनी सडेतोड भाष्य केले. “कायम तुम्ही विरोधी पक्षातच राहावे,” असे स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी विरोधी पक्षाची बोलती बंद केली. सभेच्या शेवटी नगरविकास सचिवांनी अधिकृतपणे सभागृहाचे कामकाज संपल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतरही अरविंद म्हात्रे यांनी अनावश्यक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे विरोधी पक्षाला सभागृहाच्या कामकाजाबाबत पुरेशी अभ्यासपूर्ण माहिती नसल्याचे या सभेच्या माध्यमातून अधोरेखित झाले.




