टॉप स्टोरी राजकारण

परभणीचा महापौर कोण? चंद्रपूरच्या धक्क्याने ठाकरेंची शिवसेना सावध; ‘सहल’ संपवून नगरसेवक थेट मैदानात उतरणार!

विशेष प्रतिनिधी, परभणी:चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अनपेक्षितपणे भाजपला साथ दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, आता सर्वांच्या नजरा परभणीच्या रणसंग्रामाकडे वळल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या महापौर निवडीत परभणीतही एखादा ‘राजकीय चमत्कार’ घडणार की ठाकरेंचा भगवा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या संभाव्य ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती घेतलेल्या ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने आपले नगरसेवक सुरक्षित ठिकाणी सहलीवर पाठवले असून, सत्तेचा हा सस्पेन्स आता शिगेला पोहोचला आहे.
परभणी महापालिकेच्या ६५ जागांच्या समीकरणात सत्तेचा आकडा ३३ आहे. ठाकरे गटाचे २५ आणि काँग्रेसचे १२ नगरसेवक एकत्र असल्याने वरवर पाहता त्यांचे पारडे जड दिसत असले, तरी चंद्रपूरमधील ‘युटर्न’ने परभणीतही धाकधूक वाढवली आहे. भाजपच्या गोटातून काही नगरसेवकांना गळाला लावण्याचे छुपे प्रयत्न सुरू असल्याची कुणकुण लागताच, महाविकास आघाडीने तातडीने तटबंदी मजबूत केली. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी असून, ते गुरुवारी मतदानापूर्वीच थेट सभागृहात दाखल होणार आहेत.
खासदार संजय जाधव यांनी “परभणीत आमचाच महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार,” असा दावा केला असला, तरी पडद्यामागील हालचाली वेगळ्याच चर्चेला उधाण देत आहेत. विशेष म्हणजे, भाजपकडून मंत्री मेघना बोर्डीकर यांनी जरी सध्या संख्याबळ नसल्याचे सांगत माघार घेतल्याचे भासवले असले, तरी चंद्रपूर पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची भीती ठाकरे गटाला सतावते आहे. चंद्रपूरच्या बंडखोर नगरसेवकांवर कारवाईचे ढग जमा असतानाच, परभणीचे शिलेदार कोणाला कौल देतात आणि सत्तेच्या या सारीपाटात शेवटच्या क्षणी कोणता प्यादा फिरवला जातो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *