खरी खरी संपादकीय

पाकडे,वाकडे ते वाकडेच

पाकिस्तानचा जन्म भारताच्या विभाजनातून झाला. ब्रिटिशांनी पाकिस्तानच्या दोन्ही भागात दोन पाकिस्तान निर्माण केले. पैकी पूर्व भागातील पाकिस्तान आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी दंड थोपटून उभा राहिला. १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानला बांगलादेश बनवले. इकडील पाकिस्तानच्या अन्यायाविरुद्ध तिकडचा बांगलादेश सदैव उभा होत होता. गेल्या वर्षी भारताचा मित्र असणारा बांगलादेश आता पाकिस्तानसारखाच भारताचा वैरी झाला आहे.

मागील महिन्यात बांगलादेशच्या एका खेळाडूविरुद्ध भारतात कारवाई झाल्यावर बांगलादेशच्या सरकारने भारतातील क्रिकेटचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. टी-ट्वेंटीमध्ये आपण खेळणारच नाही असे त्यांनी जाहीर केल्यामुळे आयसीसी (ICC) या आंतरराष्ट्रीय संघटनेने बांगलादेशला बाद केले, म्हणजे आता या टी-ट्वेंटी विश्वचषकात बांगलादेश राहणार नाही. त्याऐवजी स्कॉटलंडच्या संघाला प्रवेश देण्यात आला आहे. आधीच इन मीन पंचवीस ते तीस देशांमध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा हा खेळ अजूनही ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा मानला जात नाही. अशा या खेळात सद्यस्थितीत भारताचा दबदबा आहे. भारतात क्रिकेट खेळवणारी संघटनाही मोठ्या प्रमाणावर अब्जावधी रुपये कमावते, आपल्या खेळाडूंवर खर्चही करते. खेळाडूंना भरघोस मुद्रा मिळते त्यामुळे खेळाडूही प्रसिद्ध असतात.

आता बांगलादेशच्या पावलावर पाऊल टाकून पाकड्यांनीही (पाकिस्ताने) भारताबरोबर खेळणार नाही असा निर्णय जाहीर केलेला आहे. पाकिस्तान खेळो अथवा न खेळो, त्यामुळे भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. उद्या समजा प्राथमिक सामन्यात भारताबरोबर पाकिस्तान खेळला नाही आणि कर्मधर्मसंयोगाने शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला आणि त्यावेळेली पाकिस्तानने वाकडपणा करून बहिष्कार घातला, तर न खेळताच विश्वचषक भारताकडे येईल. एवढी साधी अक्कलही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला नसेल असे आम्हाला तरी वाटत नाही.

आयसीसीने बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर त्याला समर्थन देणारे पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड पाकिस्तान सरकारच्या आदेशाची वाट बघत होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी हे पाकिस्तानच्या सरकारात मंत्री आहेत. मग बहिष्कार टाकल्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटचे आणि खेळाडूंचे सर्व दृष्टीने प्रचंड नुकसान होणार आहे. एवढी साधी अक्कल नकवींकडे असती तर त्यांनी असा निर्णय घेतला नसता हे नक्की. हे नकवी महाशय आशिया क्रिकेट समितीचे अध्यक्ष होते. भारताने ज्या वेळी आशिया चषक जिंकला, त्यामुळे तो चषक भारताकडे येणे क्रमप्राप्त होते परंतु भारतीय संघाने थोडासा शहाणपणा करून नकवी यांच्यासोबत हस्तांदोलन केले नव्हते. मग नकवीने काय करावे, त्या पाकडी वाकड्याने तो चषकच घेऊन तिथून पलायन केले. म्हणजे थोडासा वात्रटपणा आपल्या संघाने केला हे मान्य करूनही चषकच पळवून नेणे हे कार्य केवळ पाकडच करू शकतात असे दिसून आलेले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांचे सामने होणे म्हणजे प्रेक्षकांचे त्यावर तुटून पडणे असते. सर्वाधिक तिकिटे विकली जातात ती या दोन देशांच्या क्रिकेटमधील संघर्षाचा सामना पाहण्यासाठी. आताच्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तान भारताबरोबर खेळणार नाही म्हणजे भारताला आपोआपच विजय मिळेल पण आपल्या भूमिकेमुळे अंतिम सामन्यात विजय मिळू शकतो. ही साधी अक्कल या वाकड्या पाकड्यांना नाही असेच दिसून येत आहे. पाकिस्तान क्रिकेटचे प्रमुख नकवी हे मुळातच वाकडे आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलेच आहे. हे पाकिस्तानचे वाकडेपण लढाईच्या रणापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत नेहमीच दिसून आले आहे. भारताकडून अनेक वेळा सपाटून मार खाल्ल्यावरही त्यांचे वाकडेपण दिवसेंदिवस वाढतच आहे असे दिसून येते. हा वाकडपणा पाकिस्तानला जगासमोर हास्यास्पद अवतारात प्रकट करत असतो.

क्रिकेटसारख्या खेळात जे पाच-पंचवीस संघ खेळतात, त्यामध्ये भारतानेही मोठेपणा दाखवून बहिष्कार-बिविष्कार न करता पाकड्यांना किंवा बांगलादेशीयांना आव्हान दाखवणे हेच उचित ठरेल. बहिष्कार वगैरे महामूर्खपणा आहे हे आता त्यांना बजावून सांगितले पाहिजे. पाकिस्तानचे वाकडे आणि आता बांगलादेशचे वाकडे यांची जोडी पुढे कोणता विनोदी कार्यक्रम दाखवील, याची वाट बघणेच आपल्या हाती आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *