नागपूर मौदा

बदलती जीवनशैली ठरतेय वंध्यत्वास कारणीभूत:डॉ. प्रतिमा सावरकर

महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या का वाढली ?

मौदा : लग्नानंतर दोन ते तीन वर्षानंतरही मूल होत नसल्याने वंध्यत्वाचे उपचार घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत आहे. महिला आणि पुरुष या दोघांमध्येही याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे असल्याचे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिमा आशीष सावरकर यांनी सांगितले.

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे ?

हा महिलांच्या अंडाशयाशी संबंधित विकार आहे, ज्यामध्ये अंडाशयामध्ये लहान-लहान गाठी (सिस्ट) तयार होतात. यामुळे हार्मोन्सच्या असंतुलनाचा परिणाम होतो. मासिक पाळीत अनियमितता, चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस येणे, केस गळणे किंवा टक्कल पडणे, वजन वाढणे आणि वजन कमी होण्यास त्रास होणे, वंध्यत्वाचा (इनफर्टिलिटी) धोका आदी लक्षणे आहेत.

वंध्यत्वाची कारणे काय ?

पुरुषांमध्ये उशिरा लग्न होणे, शुक्राणू कमी असणे, व्यसनाधीनता, ताणतणाव, लठ्ठपणा आदी बाबी

वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरू शकतात, तर महिलांमध्ये उशिरा लग्न होणे, हार्मोन्सचे असंतुलन, स्त्रीबीज कमी असणे, ताण-तणाव आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, अयोग्य आहार आणि वजनवाढ, वारंवार होणारे इन्फेक्शन्स आदी वंध्यत्वाची कारणे आहेत.

महिलांनो, तब्येत सांभाळा…!!

नोकरदार महिला असो की गृहिणी, आजही अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आहार, व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. आजारी पडल्यानंतर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे टाळून आजार अंगावर काढतात;

परंतु महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

काळजी काय घ्याल?

आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे. प्रोटीन, फायबरयुक्त अन्नपदार्थाचा समावेश करावा. जंक फूड, साखरयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. वजन नियंत्रणात ठेवावे.

वजन नियंत्रणात ठेवा वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि व्यायामाचे पालन करावे. केवळ ५ ते १० टक्के वजन कमी केल्याने पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम नियंत्रणात येऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे सेवन वेळेवर केले पाहिजे. हार्मोन्स, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी वेळोवेळी करावी. नियमितपणे स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रतिमा सावरकर यांनी दिला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *