उल्हासनगर

बी एल ओ ड्युटीबाबत शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने उल्हासनगर प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

उल्हासनगर , दि . ३० प्रतिनिधी : २९ जानेवारी रोजी दुपारी BLO ( मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) कामावर कार्यरत शिक्षक बंधू-भगिनींना सवलत मिळावी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसींबाबत दिलासा मिळावा, या मागणीसाठी मा. मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मा. श्री. विजयानंद शर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे .

हे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष मा. सुधीर घागस यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी संघटनेचे कोकण विभाग कार्यवाह मा. ज्ञानेश्वर गोसावी, राज्य कोषाध्यक्ष मा. देविदास नरवाडे, उल्हासनगर महानगर अध्यक्ष राजेंद्र गवळी, तसेच संघटनेचे मा. भाऊसाहेब सावंत, श्री. लहू केदार, श्री. पवन माटा उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे कोकण विभाग कार्यवाह ज्ञानेश्वर गोसावी यांनी शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून सुटका करावी व शिक्षक शिक्षकेतरांना बी एल ओ कामासाठी घेऊ नये, त्याचबरोबर सध्या इयत्ता दहावी व बारावीच्या अंतर्गत मुल्यमापनाची कामे, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा यामध्ये शिक्षक व्यस्त आहेत, एवढेच नव्हे तर शाळांची अध्यपनाबरोबरच इतर ही महत्वाची व ॲानलाईन कामे शिक्षकांना पार पाडावी लागत आहेत.

त्यामुळे या कामाची सक्ती प्रशासनाने शिक्षकांवर करु नये अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली असुन बीएलओची कामे जर देणारच असाल तर प्रशासनाने मुख्याध्यापकांनी सदर शिक्षकांना शालेय कामकाजातून पुर्णपणे मुक्त करावे असे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली. तर उल्हासनगर महानगर अध्यक्ष राजेंद्र गवळी यांनी बी एल ओ शिक्षक व कर्मचारीवृंद यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा मागे घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी केली. त्याचबरोबर शिक्षकांनी सातत्याने प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे, मात्र अशा कारणे दाखवा नोटीसींमुळे शिक्षक तणावात येत आहेत याबाबतची चिंता त्यांनी व्यक्त केली.

चर्चे दरम्यान उपस्थित काही मुख्याध्यापक व शिक्षकांनी देखील बी एल ओ कामातून दिलासा मिळावा, अशी मागणी केली.या सर्व बाबींवर मा. प्रांताधिकारी श्री. विजयानंद शर्मा यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून सकारात्मक चर्चा केली व यातून योग्य मार्ग काढू, असे आश्वासन संघटनेला दिले आहे. या प्रसंगी विविध शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *