महासागर डिजिटल चर्चासत्रात मान्यवरांची रोखठोक चर्चा
प्रा.अशोक सोनवणे, वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन, ॲड. निकिता पवार यांचा सहभाग
स्वप्निल दुधारे,मुंबई :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात पक्षप्रवेशाचा धुमाकूळ गेल्या काही दिवसात पाहतच होतो पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन दिवस याच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जोर धरू लागला आहे त्यातच नाशिकमध्ये तर सगळ्या पक्षातील नेते एकाच पक्षात आले अर्थातच “भाजपा” मध्ये हे सगळे पुढारी विकास कामाला प्रभावित झाले की आगामी कुंभमेळ्याच्या मलिदाचा मोह यांना कारणीभूत ठरला याविषयी ‘महासागर’ (यू ट्यूब, टीव्ही ) डिजिटल माध्यमातून आयोजित या विशेष चर्चासत्रात राजकीय विश्लेषक लेखक तथा वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सध्याच्या गलिच्छ राजकारणावर आणि यापूर्वीच्या राजकारणावर विचार मंथन केलं.
या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशोक सोनवणे, वरिष्ठ पत्रकार प्रा. जयंत महाजन आणि राजकीय विश्लेषक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ॲड.निकिता पवार सहभागी झाले होते. महासागर डिजिटल चे संपादक स्वप्निल दुधारे यांनी या चर्चेचा निवेदन केलं.
चर्चेत सहभागी प्रा. अशोक सोनवणे यावेळी म्हणाले की “स्वतःची राजकीय सोय कुठे लागेल असा विचार करून आज-काल एक राजकीय समूह तयार झाला असून यापूर्वीच राजकारण कसं होतं याचेही त्यांनी उदाहरण दिल. 1972 च्या दुष्काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक दुष्काळ दौऱ्यावर असताना रोजगार हमीवर एक जोडपं काम करताना दिसलं आणि मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटलं कारण तो काम करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अगोदरच्या विधानसभेचा सदस्य होता. म्हणजे त्याकाळी राजकारण हे पैशासाठी नव्हतं तर समाजासाठी होतं असं त्यांनी महासागरच्या चर्चासत्रात नमूद केलं.
त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार तथा दै.महासागर, नाशिकचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन यांनी नाशिक मधील पक्षप्रवेशा मागचं गूढ उकलत हा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात का होतो हे सांगितलं. त्याचबरोबर आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर येणारा भरमसाठ निधी लाटण्यासाठी सगळ्यांचे लक्ष या महापालिका निवडणुकीत गुंतल असून त्यातून माझं कसं भलं होईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांनी या चर्चासत्रात सांगितलं.
या चर्चासत्रात पंढरपूर वरून सहभागी झालेल्या ॲड निकिता पवार यांनी यापूर्वीच्या निवडणुकीवर प्रकाश टाकत सांगितलं की पूर्वी पंढरपुरात निवडणुकीसाठी भाजपाचे आलेले कार्यकर्ते हे आम्ही निवडून आलो तर काय करू आणि आमची काय विचारधारा आहे हे लोकांकडे सांगायचे आणि त्यावेळी आठवडाभराच्या मुक्कामात ते आमच्या घरी देखील मुक्काम करायचे अशी आठवण त्यांनी करून दिली त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये एका निष्ठावंत महिलेला केवळ तिची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे पक्षाने तिकीट दिलं नाही हे देखील त्यांनी या चर्चासत्रात नमूद केलं.



