चंद्रपूर टॉप स्टोरी विदर्भ

भाजप आणि एमआयएममध्ये ‘छुपी युती’? काँग्रेसच्या पराभवानंतर सपकाळ यांनी नक्की कोणावर डागली तोफ?

विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्याने महाविकास आघाडीतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. “अंजनगाव सुर्जी, अकोट आणि अचलपूरप्रमाणेच आता चंद्रपुरातही भाजप आणि एमआयएमची ‘अदृश्य युती’ उघड झाली आहे,” असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

एमआयएमने मतदानाच्या वेळी तटस्थ राहून भाजपचा मार्ग सुकर केल्याने ‘हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. “आम्ही वंचितला सोबत घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. जर त्यांनी काँग्रेसला साथ दिली असती, तर आज चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचा असता,” असे ते म्हणाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत गोटात फाटाफूट झाल्याच्या चर्चा त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती, त्यामुळे पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपुरातील या राजकीय घडामोडींचे पडसाद आता पक्षपातळीवर उमटणार आहेत. या निवडणुकीचा सविस्तर अहवाल पक्ष निरीक्षकांकडून मागवण्यात आला असून, त्यानंतर यावर सखोल चर्चा करून पुढील धोरण ठरवले जाईल, असे संकेत सपकाळ यांनी दिले आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात नेमकं कुठे पाणी मुरलं, याचा शोध आता काँग्रेस घेणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *