चंद्रपूर

मध्यरात्री मेंढ्या ओरडल्या, पाहणी करायला गेला अन् काळ समोर उभा होता; चंद्रपुरात नेमकं काय घडलं?

विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-वन्यजीव संघर्षाची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोंभूर्णा तालुक्यातील फिस्कुटी शेतशिवारात आपल्या मेंढ्यांचे रक्षण करणाऱ्या एका तरुण मेंढपाळावर वाघाने झडप घालून त्याचा जीव घेतला. या भीषण घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थ चांगलेच हादरले आहेत.

वासुदेव कंकलवार (वय ३६ वर्षे, रा. जुनासुर्ला) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. वासुदेव आपल्या मेंढ्यांच्या कळपासह फिस्कुटी येथील शेतशिवारात मुक्कामी होता. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मेंढ्या ओरडण्याचा आवाज आल्याने काहीतरी संकट आल्याची जाणीव वासुदेवला झाली. आपल्या कळपाचे रक्षण करण्यासाठी तो बॅटरी घेऊन शिवारात पाहणी करायला गेला. मात्र, दबा धरून बसलेल्या वाघाने अंधाराचा फायदा घेत वासुदेववर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून पीडित कुटुंबाला तत्काळ प्राथमिक आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. “आम्ही जगायचे कसे? शेतात जायलाही आता भीती वाटते,” अशा भावना स्थानिक व्यक्त करत आहेत. वनविभागाने संबंधित वाघाला तातडीने जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *