खरी खरी संपादकीय

मरणाची स्फोटक कथा

परवा नागपूर जवळ काटोल तालुक्यातील स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट होऊन त्यात जवळजवळ १८ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. नागपूर जवळील या स्फोटामुळे आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना उभ्या राहतात. निरपराध कामगारांचा मृत्यू, लहान लहान बालकांचे अनाथ होणे आणि कुटुंबीयांचा आक्रोश बघितला जात नाही. येथील अनेक कामगार जखमी आहेत त्यांचीही परिस्थिती गंभीर आहे, अशा प्रकारे विस्फोट होणारे कारखाने केवळ नागपुरातच आहेत असे नाही तर ते संपूर्ण देशात आहेत.

परवा आंध्र प्रदेशातील काकिनाडा जिल्ह्यात फटाके बनवण्याच्या कारखान्यात विस्फोट होऊन २० ते २२ लोक मृत्यू पावले. नागपुरातील काल झालेल्या घटनेच्या कारखान्यात यापूर्वीही अनेकदा विस्फोट झालेले आहेत. या कारखान्यात डिटोनेटर आणि स्फोटक काडतुसे तयार करण्यात येतात. काल सकाळी सहा वाजता पहिला विस्फोट झाला ज्याचा आवाज जवळपास पाच किलोमीटरपर्यंत ऐकू आला, त्यानंतर त्या ठिकाणी स्फोट होतच होते. सुरुवातीच्या विस्फोटामुळे अनेक शव जवळच्या शेतात जाऊन पडले. जवळपासच्या घरांचे ज्यामुळे अतोनात नुकसान झाले, अनेक घरांच्या काचाही फुटल्या तर काही घरांना तडे गेले.

हा सर्व प्रकार पाहिल्यावर असे वाटते की अशा प्रकारच्या कारखान्यांना सुरक्षाविषयक जे काही नियम आहेत ते पाळणे गरजेचे असते हे समजत नाही काय? आणि समजत असेल पण उमजत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई का होऊ नये. मरणाऱ्या बिचाऱ्या महिला आणि पुरुषांना पाच ते दहा लाख रुपये देऊन सरकारचे किंवा कारखानदारांचे समाधान होत असेल. पण ज्यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत हे त्यांना कोण समजावून सांगणार.

अशा कारखान्यांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे व्यवस्थितपणे लावणे गरजेचे आहे याचे काटेकोर आदेश दिले गेले पाहिजेत आणि जर ते आदेश पाळले जात नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अशी घटना घडली की दोन-चार दिवस वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे टाहो फोडतात आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तशीच घटना घडते. ज्या ठिकाणी सगळे कामच अशा प्रकारच्या स्फोटकांचे असते त्या ठिकाणी तर जराशी चूकही फार मोठा अपघात घडवू शकते. अशा कारखान्यात काम करणारे श्रमिक पोटाची खळगी भरण्यासाठी बिचारे आपला जीव पणाला लावतात. या लोकांना प्रशिक्षण तरी देण्यात येते की नाही, तसेच बचावासाठी काय केले पाहिजे हे तरी शिकवले जाते की नाही याचाही विचार केला पाहिजे.

औद्योगिक सुरक्षेच्या नावावर काम करणाऱ्या संस्था कारखान्यात अशा मोठ्या घटना घडल्यावरच चर्चेत येत असतात. सरकारलाही अशा घटनांची जास्त प्रसिद्धी व्हावी असे वाटत नाही. सर्वात मोठा दोष कंपनीचा असला तरी सरकारी यंत्रणा काय करते, हा ही प्रश्न आहे. दुर्घटना घडल्यावर बोंबाबोंब होणे स्वाभाविक आहे कारण दुर्घटना झाली म्हणजे सर्वच गंभीर होतात. एक दुसऱ्यावर आरोप करून मोकळे होतात परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणालाच मिळत नाहीत. एखादी दुर्घटना घडली की त्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज संबंधित कंपनीलाही वाटत नाही आणि सरकारी यंत्रणांनाही वाटत नाही, हीच शोकांतिका आहे.

नागपूर जवळ घडलेली कालची घटना जरा वेगळ्या प्रकारची आहे. मरण पावलेल्यांमध्ये एक दोन अपवाद सोडल्यास सर्वच महिला आहेत. अनेकांची अपत्ये अगदी लहान आहेत त्यातच या घटनेचे हृदयद्रावक चित्र बघितल्यावर आणि नातलगांचे आसवे पाहिल्यावर कठोरातला कठोर माणूसही विरघळतो. आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रचंड प्रगती केलेली आहे. अशा प्रकारच्या कारखान्यात होणाऱ्या स्फोटांच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. आता सरकारनेच या बाबतीचा गंभीरपणे विचार करून निकाल लावला पाहिजे. एखाद्या ठिकाणी जीवाच्या जोखमीचा उद्योग सुरू असेल तर त्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. ते केले नसतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे.

उपस्थित प्रश्नांना आणि समस्यांना डावलून नवनवीन कंपन्यांच्या मागे धावण्यापेक्षा जे आहे, त्यामध्ये कोणत्या सुधारणा करण्यात करता येतील हे पाहणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जनतेच्या प्राणाला निश्चितच मोठी किंमत आहे. हे जो कोणी समजून घेईल, तोच महाराष्ट्राला ललामभूत होईल, यापुढे अशीच पावले उचलली गेली पाहिजेत. आपल्या राज्याचे सुविद्य मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणा यांनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *