महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; तीन दिवसांचा राज्य दुखवटा आणि आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सन्मानार्थ राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने (राजशिष्टाचार) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रशासनाला खालीलप्रमाणे कडक अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत:
राज्यात तीन दिवस दुखवटा (२८ ते ३० जानेवारी)
दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे आजपासून तीन दिवस म्हणजेच ३० जानेवारी २०२६ पर्यंत संपूर्ण राज्यात शासकीय दुखवटा पाळला जाईल. या काळात राज्यातील ज्या सर्व इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तेथे राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.
आज सर्व शासकीय कार्यालये बंद
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्य शासनाने आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी, राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय कार्यक्रम रद्द
दुखवट्याच्या या तीन दिवसांच्या कालावधीत राज्य सरकारकडून कोणताही अधिकृत मनोरंजनाचा किंवा आनंदाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.
प्रशासकीय यंत्रणा सतर्क
मंत्रालयाचे अवर सचिव एच.पी. बाविस्कर यांनी यासंदर्भातील आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि विभागीय आयुक्तांना ‘तात्काळ’ या श्रेणीखाली पाठवले आहेत. पोलीस वायरलेस यंत्रणेद्वारे हा संदेश गावपातळीपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




