टॉप स्टोरी राजकारण

महाविकास आघाडीच्या फुटीचे ‘ते’ गुपित अखेर उघड? सुनील तटकरेंचा रोहित पवारांना जळजळीत इशारा!

विशेष प्रतिनिधी:राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना आता तटकरेंनी सडेतोड उत्तर दिले असून, यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या फुटीचा जुना इतिहासही चव्हाट्यावर आणला आहे.
रोहित पवार यांनी एका फाईलवरील सही आणि कंत्राटाच्या वादावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाष्य करताना तटकरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “हे सर्व आरोप केवळ द्वेषापोटी केले जात आहेत. दादा (अजित पवार) हयात असतानाही अशाच प्रकारचे आरोप करून काही लोकांनी त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले होते,” अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांचे नाव न घेता निशाणा साधला. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना त्यांनी निव्वळ ‘अफवा’ ठरवले असून, या अफवा पसरवणाऱ्यांची नावे योग्य वेळ आल्यावर उघड करू, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला आहे.
जागावाटपाचा ‘तो’ विश्वासघात!
यावेळी तटकरे यांनी २०१४ मध्ये आघाडी तुटण्यामागचे खळबळजनक कारण सांगितले. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या वेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जागावाटपाची चर्चा सुरू होती. आम्ही काही जागा बदलून मागितल्या होत्या आणि त्याप्रमाणे यादी दिली होती. मात्र, काँग्रेसने त्याच यादीचा आधार घेत त्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. आघाडी फुटण्याचे हेच पहिले आणि मुख्य कारण होते.”
भाजपमध्ये मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक मिळते आणि आमचे मत विचारात घेतले जाते, असा दावा करत त्यांनी सध्याच्या युतीचे समर्थन केले. तटकरेंच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, दोन्ही राष्ट्रवादीमधील ‘कलगीतुरा’ आता अधिकच रंगणार असल्याचे चिन्हे आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *