नवी मुंबई

मातृभाषेतुन शिक्षण देणा-या शाळा वाचण्यासाठी क्रांतिज्योती विद्यालय सिनेमा करमुक्त करावा- चित्रपटाच्या टीमसह शिक्षण क्रांती संघटनेची मागणी

नवी मुंबई:राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रमातील अवघड संकल्पना लवकर समजण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतुन किंवा स्थानिक समुदायात बोलल्या जाणा-या भाषेतुन होणे गरजेचे आहे. सध्या गाजत असलेला क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट देखील हाच संदेश देत आहे. यासाठी हा सिनेमा अधिकाधीक घरांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.

हा चित्रपट करमुक्त केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल. याबाबतचे निवेदन शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिका-यांच्या मार्फत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, क्रांतिज्योती विद्यालयाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे,निर्माती क्षिती जोग, अभिनेते अमेय वाघ, हरेश दुधाळे, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, कोकण विभाग कार्यवाह ज्ञानेश्वर गोसावी, उल्हासनगर महानगर अध्यक्ष राजेंद्र गवळी, ठाणे महानगर अध्यक्ष किशोर राठोड हे उपस्थित होते.

मातृभाषेतुन शिक्षण घेणा-या मुलांना शैक्षणिक संकल्पना दृढ झालेल्या असतात त्यामुळे उच्च शिक्षण घेताना त्यांना अध्ययनात अडचणी येत नाही व पुढील शिक्षण सहज होते. परंतु इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेतल्यास मुलं हुषार होतात असा गैरसमज पालकांच्या मनात झालेला आहे. क्रांतिज्योती विद्यालय चित्रपट पाहिल्यास हा गैरसमज दुर होऊन मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व पालकांच्या लक्षात येईल असा विश्वास सुधीर घागस यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याजवळ व्यक्त केला. चित्रपट करमुक्त करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पाचांळ यांनी चित्रपटाची टीम व शिक्षण क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांना सांगितले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *