मालेगाव | विशेष प्रतिनिधी:गेल्या अनेक महिन्यांपासून १७८ कोटींच्या कथित घोटाळ्यावरून एकमेकांवर तुटून पडणारे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील संघर्ष अखेर मालेगाव न्यायालयाच्या उंबरठ्यावर नाट्यमयरित्या संपुष्टात आला आहे. एकमेकांचे राजकीय वैरी समजल्या जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी आज एकत्र येत वादावर पडदा टाकला असून, राऊतांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भुसेंनीही त्यांच्यावरील फौजदारी खटला मागे घेण्याची घोषणा केली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी म्हणजे, संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर १७८ कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. या विरोधात भुसे यांनी न्यायालयात धाव घेत अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. आज या खटल्याच्या सुनावणीसाठी दोन्ही नेते कोर्टात हजर झाले आणि त्यांनी तोडगा काढल्याचे जाहीर केले. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यांनी केलेले विधान चुकीचे होते आणि पडताळणीअंती त्यांना आपली चूक उमजली आहे. तसेच, अद्वैत हिरे यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाल्याचे सांगत राऊतांनी हिरे यांना टोला लगावला.
दादा भुसे यांनीही यावेळी नमते घेत ‘मोठेपण’ दाखवले. “राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली असून, आमचे जुने मैत्रीचे संबंध आणि त्यांच्या तब्येतीचा विचार करून हा खटला संपवत आहोत,” असे भुसे यांनी नमूद केले. आम्ही राऊतांच्या हाताखाली काम केले आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. विशेष म्हणजे, “आमची मैत्री कायम राहील” या राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. न्यायालयाच्या पायरीवर झालेली ही मैत्री राज्याच्या राजकारणात भविष्यात कोणती नवीन वळणे घेणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.




