टॉप स्टोरी राजकारण

मुंबईच्या रस्त्यावर आता ‘मराठी’ विरुद्ध ‘तमिळ’ संघर्ष पेटणार?

भाजप आमदाराने राज ठाकरेंना ‘एक लाख’ लोकांच्या मोर्चाचा इशारा का दिला?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वारे अजून शांत झाले नाहीत, तोच शहरात प्रादेशिक अस्मितेचा नवा वाद उफाळून आला आहे. सायन-कोळीवाडा येथील भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “आमच्याविरोधात बोलाल, तर मुंबईत १ लाख तमिळ बांधवांचा मोर्चा काढू,” असा थेट इशारा सेल्वन यांनी दिल्याने मुंबईत आता ‘तमिळ-मराठी’ वादाची नवी कुरुक्षेत्रं तयार होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भक्तीच्या रॅलीला राजकीय वळण!
निमित्त होतं भगवान मुरुगन यांच्या ‘थैपूसम’ उत्सवाचं. सायन कोळीवाडा ते माटुंगा येथील ऐतिहासिक मुरुगन मंदिरापर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘पाळकुडम कावडी अट्टम’ रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचं नेतृत्व भाजप आमदार तमिळ सेल्वन करत होते. पारंपरिक वाद्यं आणि कावडींच्या गजरात निघालेल्या या धार्मिक रॅलीत सेल्वन यांनी अचानक राज ठाकरेंच्या जुन्या विधानाचा समाचार घेत राजकीय बॉम्ब टाकला.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला जशास तसं उत्तर?
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील तमिळ भाषिकांच्या वाढत्या प्रभावावर आणि भाजपचे तमिळनाडूचे नेते अण्णामलाई यांच्या विधानावर सडकून टीका केली होती. अण्णामलाई यांनी “मुंबई हे महाराष्ट्राचे नाही” असं म्हटल्यानं राज ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. याच टीकेचा वचपा काढताना सेल्वन म्हणाले, “काही मोठे नेते तमिळ बांधवांच्या विरोधात बोलत आहेत. आजची ही गर्दी म्हणजे त्यांना दिलेलं उत्तर आहे. आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील.”

१ लाखांचा मोर्चा: इशारा की धमकी?
आमदार तमिळ सेल्वन इथं थांबले नाहीत. त्यांनी राज ठाकरेंना थेट चॅलेंज देत म्हटलं, “ही तर फक्त एक झलक आहे. येत्या एका महिन्यात मुंबईत १ लाख तमिळ बांधवांची याहून मोठी रॅली काढून आम्ही आमची खरी ताकद दाखवून देऊ.” मुंबईच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे ताकद दाखवण्याचा इशारा दिल्यानं मनसे आता यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपची कोंडी की रणनीती?
एकीकडे भाजप ‘मराठी मतदारांना’ साद घालत असताना, दुसरीकडे त्यांचेच आमदार तमिळ भाषिकांच्या नावाखाली मनसेशी भिडत आहेत. यामुळे मुंबईच्या राजकारणात भाजपची कोंडी होणार की हा परप्रांतीय मतांच्या ध्रुवीकरणाचा भाग आहे? असा सवाल राजकीय विश्लेषक विचारत आहेत. या वादात आता ‘मराठी अस्मिता’ विरुद्ध ‘तमिळ एकजूट’ असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

राज ठाकरे हे नेहमीच ‘खळ्ळ-खट्याक’ शैलीसाठी ओळखले जातात. भाजप आमदाराने दिलेल्या या इशाऱ्यानंतर मुंबईत मनसे आणि भाजपचे तमिळ समर्थक समोरासमोर आले, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. येत्या काळात हा वाद मुंबईच्या राजकारणाला कोणतं वळण देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *