मुंबई

रेल्वे प्रवाशांना स्थानकावरच मिळणार ‘लाईफ लाईन’; १८ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; खा. संजय दिना पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई, विशेष प्रतिनिधी:रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात आणि त्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ओढवणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कंबर कसली आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, मध्य रेल्वेच्या १८ महत्त्वाच्या स्थानकांवर अत्याधुनिक आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (EMR) उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे जखमी प्रवाशांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहे.

१८ स्थानकांवर सुविधेचे जाळे

मध्य व हार्बर मार्गावरील ९० स्थानकांपैकी सध्या केवळ ४ स्थानकांवरच अशी सुविधा उपलब्ध होती. ही उणीव भरून काढण्यासाठी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनाकडे सातत्याने मागणी केली होती. या प्रयत्नांना यश मिळून आता १८ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १० स्थानकांसाठी ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित ८ स्थानकांसाठी लवकरच प्रक्रिया पार पडणार आहे.

रुग्णवाहिका आणि जीवनरक्षक यंत्रणा

नव्याने सुरू होणाऱ्या या वैद्यकीय कक्षांमध्ये केवळ प्राथमिक उपचारच नव्हे, तर तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी आणि अत्याधुनिक जीवनरक्षक यंत्रणा (Life Support System) उपलब्ध असेल. याशिवाय, प्रत्येक स्थानकावर २४ तास रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गर्दीच्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांची नियुक्ती करण्याची मागणीही रेल्वे प्रशासनाने मान्य केली आहे.

“रेल्वे प्रवाशांचा जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता आहे. अनेकदा उपचाराअभावी होणारे मृत्यू वेदनादायक असतात. आता १८ स्थानकांवर ही सुविधा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

— खा. संजय दिना पाटील (सदस्य, केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती)

या निर्णयामुळे मुंबईतील लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आपत्कालीन परिस्थितीत आता स्थानकावरच तातडीची मदत उपलब्ध होणार आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *