माणूसपणाची पाऊलवाट

लोग हमसे जुडते गये और कारवाॅ बनता गया

लोग हमसे जुडते गये, और कारवाॅ बनता गया. या ओळीमध्ये जेवढी शब्दांची नजाकत दडली आहे तेवढेच एखाद्या यशस्वी सामाजिक चळवळीमागील नेतृत्व गुण, सक्रिय कार्यशक्ती आणि संघटन कौशल्य दडले आहे. आणि नेमकी हीच बाब हेरून धीरज पवार यांनी गावा गावातील तरुणांना एकत्र आणले, विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, शासकीय अधिकारी, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क वाढविला. या संघटनेतून एका छोट्याशा गावातून सुरू केलेली शैक्षणिक आणि आरोग्य विषयक चळवळ आता राज्य पातळीपर्यंत व्यापक झाली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या गरजू रुग्णापर्यंत शासकीय निधी उपलब्ध करून देणारा आरोग्यदूत म्हणून धीरज पवार गरिबांचे कैवारी झाले आहेत.
एका रुपयाचे शंभर रुपये कसे करता येईल हाच व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून एक व्यवसायिक आपली कार्यशक्ती आणि वेळ खर्च करीत असतो. पण बांधकाम व्यवसायामध्ये यशाची एक एक पायरी चढणारे‌ आणि सोबतच पंचायत समितीमध्ये कंत्राटी तत्वावर टेक्निकल असिस्टंट म्हणून नोकरीवर असणारे धीरज पवार यांनी एखादा कॉन्ट्रॅक्ट कमी मिळाला तरी चालेल पण एका गरजू गरिबाच्या कामी आपण आलो पाहिजे या भावनेतून त्यांनी आपल्या व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा हे एक छोटेसे खेडेगाव. या खेडेगावात शेतकरी कुटुंबात आबासाहेब पवार आणि नंदाबाई पवार यांच्या पोटी धीरज पवार यांचा जन्म झाला. मराठी जिल्हा परिषद शाळेमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिविल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा आणि पुढे पदवी घेतली. आज बांधकामाचा स्वतःचा व्यवसाय थाटला असून सोबतच पंचायत समितीमध्ये कंत्राटी तत्वावर टेक्निकल असिस्टंट म्हणून कार्य करीत आहे. लहानपणापासूनच गरजूंना मदत करण्याच्या स्वभावाला आणि संघटन कौशल्याला महाविद्यालयामध्ये खतपाणी मिळाले.‌ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांच्या काही मित्रांचे विषय बॅक राहिले. पुढच्या वर्षाला त्यांना प्रवेश मिळत नसल्यामुळे त्यांचे एका वर्षाचे नुकसान होणार होते. आपल्या या मित्रांना पुढील वर्षी प्रवेश मिळावा व त्यांचे विषय काढता यावे यासाठी त्यांना कॅरी ऑनची संधी मिळावी यासाठी त्यांनी काही मित्रांना सोबत घेऊन विद्यापीठामध्ये पाच ते दहा दिवसांचे आंदोलन केले. आणि विशेष म्हणजे या आंदोलनाला त्यांना यश मिळाले आणि अटी व शर्तीसह त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. आणि त्यांच्या मित्रांना त्यांना न्याय मिळवून देता आला.

या प्रसंगामुळे त्यांच्या नेतृत्व कौशल्याला बळ मिळाले आणि त्यांना वाटले की आपण असेच कार्य जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी केले तर फुल नाहीतर फुलाची पाकळी या तत्त्वावर आपण समाजाचे ऋण फेडू शकतो. अशातच सकाळ समूहाच्या यिन उपक्रमांशी ते जुळल्या गेले. जिल्हा अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर विविध सामाजिक कार्य करीत असताना विविध क्षेत्रातील कर्तबगार मंडळी, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या संपर्कात आले. त्यांचे कार्य त्यांना जवळून अनुभवता आले. या संपर्कातून ते गाव खेड्यातील जिल्हा परिषद शाळा व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये थोर पुरुषांच्या जयंतीच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शाळेमध्ये शाळेचा निधी व गाव वर्गणीतून स्वच्छतागृह उभारणे, शाळेत आकर्षक वर्गखोल्या बांधणे या शैक्षणिक कार्यासोबतच ते आरोग्य विषयक कॅम्पस घेऊ लागले.

या कॅम्पमध्ये ज्या विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना जेव्हा कॅन्सर आणि सारख्या दुर्धर आजाराचे निदान लागले. आणि त्याच्या उपचारासाठी त्या गरिब रुग्णाकडे पैसे नसत अशा वेळेस त्यांना शासकीय योजनेतून निधी कसा उभारता येईल या विचाराने त्यांना ग्रासलेच नाही तर त्यांनी त्यासाठी झपाटून काम सुरू केले. त्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. त्या वेळचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, मंगेश चिवटे आणि आताचे डॉक्टर नाईक यांच्याशी ते सतत संपर्क साधून होते.

या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत ते गरीब रुग्णांना उपचारासाठी निधी मिळवून देण्यात यशस्वी ठरत गेले आणि असा त्यांचा आरोग्य क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
रक्तदान शिबिरे, रक्त तपासण्या, सिविल हॉस्पिटल ला भेटी देणे, आरोग्य शिबिरे लावणे यातून ते अनेक गाव खेड्यातील रुग्णांशी जुळले गेले. एक चांगले कार्य केले तर त्या गावातील दहा-पंधरा तरुण त्यांच्याशी जुळत गेले. ही साखळी निर्माण होत गेली आणि त्यांचे कार्य व्यापक होत गेले. त्यांच्या या कार्यातून त्यांच्या मंत्रालयापर्यंत ओळखा झाल्या. आमदार फंड खासदार फंड विविध शासकीय योजनांतून ते अपघात झालेल्यांना विविध खर्चिक आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना निधी उपलब्ध करून देऊ लागले. ते सिविल इंजिनियर असल्यामुळे त्यांचा संपर्क मोठ्या मोठ्या कंपनीशी आहे.

गावातील तरुणांना येथे रोजगार उपलब्ध करून देणे, नवउद्योजक व शेतकरी यांना लोन मिळवून देणे, त्यासाठी असलेल्या कागदपत्रांच्या अडचणी दूर करणे यासारखे कार्य ते करू लागले.
ते एक प्रसंग सांगतात की एका तरुणाचा अपघात झाल्यानंतर त्याला चालता येईना. तात्काळ ऑपरेशन केले नाही तर पाय तोडण्याची पाळी त्याच्यावर येणार होती. ही गोष्ट जेव्हा धीरज पवार यांना कळली तेव्हा त्यांनी लगेच विविध व्यक्तींशी संपर्क साधला. आणि त्याला पंचतारांकित हॉस्पिटल मधून उपचार मिळवून दिला. डोळ्यात पाणी आणून तो तरुण त्यांना म्हणाला की आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. या प्रसंगामुळे ते गहिवरून आले आणि ते म्हणतात की एखाद्याच्या आयुष्यात जर आपण हसू फुलवू शकलो तर त्याचे समाधान लाख रुपयांमध्ये सुद्धा नाही.

धीरज पवार म्हणतात की गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा आरोग्य रुग्णालय येथील आरोग्य सेवा या तटपुंज्या आहेत. कित्येक वेळा गरजूंना आयसीयू उपलब्ध होत नाहीत. विविध शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांना व्हावी यासाठी जनजागृतीची गरज आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत. भविष्यामध्ये या सर्व बाबींवर काम करायचे आहे असे ते पोटतिडकीने म्हणतात.

जेवढ्या पोटतिडकीने ते सामाजिक कार्य करतात तेवढाच प्रामाणिकपणा त्यांच्या बांधकाम व्यवसायामध्ये ही दिसून येतो. बीड जिल्ह्यातील कमी वेळात यशस्वी झालेले तरुण उद्योजक म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली असून पारदर्शकता, प्रामाणिकपणा, गुणवत्ता या तत्वांशी एकनिष्ठ असलेले धीरज पवार आपल्या ग्राहकांमध्ये‌ विश्वास निर्माण करतात आणि त्यांच्या स्वप्नांना आकार देण्याचे कार्य आपल्या व्यवसायातून ते सक्षम पणे करत आहेत.
युवाशक्ती आणि जनसंपर्क हेच यशाचे सूत्र मानणाऱ्या धीरज पवार यांनी बांधकाम व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक कार्य यामध्ये उत्तम मेळ बसविला आहे. समाजसेवेचे त्यांनी घेतलेले हे व्रत सदैव फळास येत राहो यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा.

 

धीरज पवार

संपर्क क्रमांक
9372482525

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *