विधानभवनाचा ‘किल्लेकोट’ बंदोबस्त; यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहुण्यांना एन्ट्री मिळणार का?
विशेष प्रतिनिधी:आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ साठी विधानभवन सज्ज होत असतानाच, यंदाची सुरक्षा व्यवस्था आणि शिस्त कमालीची कडक असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतलेल्या पूर्वतयारी बैठकीत ‘सुरक्षा आणि गर्दी नियंत्रण’ या दोन मुद्द्यांवर सर्वाधिक भर दिला आहे. यामुळे दरवर्षी अधिवेशनादरम्यान विधानभवनात दिसणारी अलोट गर्दी यंदा मर्यादित केली जाण्याची शक्यता आहे.
सभापतींनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, विधानभवन परिसरात शिस्त राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने विशेष नियोजन करावे. विशेष म्हणजे, मंत्री आणि आमदारांच्या भेटीसाठी येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य अभ्यागतांच्या प्रवेशावर यंदा अधिक निर्बंध येण्याची चिन्हे आहेत.
सुरक्षेसोबतच सुविधांचेही ऑडिट
केवळ बंदोबस्तच नव्हे, तर विधानभवनातील ‘फूड कोर्ट’पासून ते इंटरनेट सुविधेपर्यंत सर्वच गोष्टींचा सभापतींनी आढावा घेतला. उपहारगृहातील पदार्थांची अन्न व औषध प्रशासनामार्फत (FDA) नियमित तपासणी करावी आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशनापेक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिक काळ चालत असल्याने अखंडित वीज आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीला मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस सहआयुक्त आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सभापतींच्या या कडक भूमिकेमुळे यंदाचे अधिवेशन ‘हाय-टेक’ आणि अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार, हे निश्चित झाले आहे.




