अमेरिकेने आज भारताला रशियाकडून क्रूड ऑइल (Crude Oil) खरेदी करण्याची मुभा दिली आहे. भारताला अशा प्रकारची परवानगी देण्यासाठी अमेरिकेबरोबर व्यापाराचा जो करार झाला पाहिजे, तो अजूनही झालेला नाही. या न झालेल्या करारात अंतर्भूत असलेल्या कलमांद्वारे भारताला रशियाकडून तेल खरेदीचा विचारही करता येत नाही. पण आता ट्रम्प दादांनी तीस दिवसांची मुदत देऊन भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास सांगितले आहे.
अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे काही दिवसांनंतर रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र एकूण जागतिक परिस्थिती पाहून आता रशियाने आतापासूनच ‘आम्ही युरोपला तेल देणार नाही’ असे जाहीर केले आहे. त्यातच इराणने तोंड दाबल्यामुळे युरोप खंडात लवकरच हाहाकार माजणार आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज न घेता इराणवर आक्रमण करण्याचा मूर्खपणा करून आपला दीडशहाणेपणा ट्रम्पने सिद्ध केला आहे. पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची हत्या करून जागतिक युद्धाचे सर्व नियम या ट्रम्पने पायदळी तुडवले आहेत.
आता इराणने नाकेबंदी केल्यावर युरोपीय राष्ट्रांना भारताकडून पेट्रोल खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. आज या सर्व परिस्थितीला शरण जाऊन ट्रम्पने युरोपमधील देशांच्या पंपांना पेट्रोल पुरवता यावे म्हणून मोठ्या उदारतेचा आव आणून भारताला हा आदेश दिला आहे. भारताला तेल म्हणजेच क्रूड ऑइल विकण्यासाठी रशिया तयार आहे. त्याचे शुद्धीकरण करून भारतातील ऑइल रिफायनरीज युरोपीय देशांना पेट्रोल पुरवू शकतात, तसेच देशातील तेल साठाही योग्य प्रमाणात साठवू शकतात.
खरे तर इराणने पहिल्याच दिवशी जाहीर करून टाकलेले होते की, “बेटा ट्रम्प, युद्ध तू सुरू केलेले आहेस पण त्याचा शेवट आम्ही करू.” वास्तविक अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला अशी धमकी देण्यासाठी किती तयारी लागते, यासोबतच किती हिम्मत लागते याचा अंदाज न केलेलाच बरा. इराणने ज्या अर्थी अशी हिम्मत केली, त्या अर्थी त्यांनी पूर्ण तयारी केलेली दिसते. त्यामुळे येणाऱ्या म्हणजेच आगामी तीस दिवसांत ही लढाई चालू ठेवण्यासाठी इराण तयार असेल असे समजून अमेरिकेने भारताला ३० दिवसांचा परवाना दिला असावा.
आपल्याला प्रश्न पडू शकतो की भारताला अमेरिका असा आदेश कसा देऊ शकते? आपण सार्वभौम प्रजासत्ताक आहोत, जगातील साधारणपणे १५% लोकसंख्येचा हा देश आहे. मग आता भविष्यात या युद्धामुळे अमेरिकेला कोणत्या कोणत्या कोलांटउड्या माराव्या लागतात हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. भारताने कोणत्याही प्रकारे मागणी न करता अमेरिका रशियाकडून क्रूड ऑइल खरेदीसाठी मान्यता देते, यावरून इराणने अमेरिकेचे नाक आणि तोंड कसे दाबलेले आहे हेच दिसून येते.
अमेरिकेला यापुढे गल्फ म्हणजेच आखाती देशांची सुरक्षा सांभाळणे कदाचित शक्य होणार नाही असे दिसते. इराणने संयुक्त अरब अमिरातीपासून अगदी दुबईपर्यंतच्या सर्व अमेरिकन तळांना उद्दिष्ठ करून त्या देशांना वाऱ्यावर सोडलेले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, हे छोटे छोटे गडगंज श्रीमंत असलेले देश जे अमेरिकेच्या तालावर नाचत असतात, त्यांचे नाचणेही आता बंद होणार आहे. तरी बरं, इराणने या देशांमधील अमेरिकन तळांवर आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठानांवरच हल्ले केलेले आहेत.
आता पुढील काळात अमेरिकेला जगातील प्रत्येक देशावर हुकमत गाजवण्याची संधी मिळेल की नाही, हा सुद्धा महत्त्वाचा सवाल आहे. एकूणच इराणने ट्रम्पच्या नाका-तोंडाला फेस आणून त्याच्या नाकातून शेंबूड काढणेही त्याच्यासाठी ‘जड झाले ओझे’ असे करून टाकलेले आहे. अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी आपली शस्त्रास्त्रे विकण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अमेरिकेतील शस्त्रास्त्रांचे कारखानदार आणि व्यापारी भरपूर पैसा कमवत होते, ज्याचा अमेरिकेलाही लाभ होत होता. आता दुसऱ्या महायुद्धानंतर या तिसऱ्या महायुद्धसम परिस्थितीतून जगाला कोणता संदेश जातो हे जग बघणार आहे. अशा प्रकारे इराणने बिचाऱ्या ट्रम्पचे तोंड बंद करून त्याला भरदिवसा हैराण केले आहे आणि त्याची रात्र वैराण केली आहे.
आगे आगे देखिये होता है क्या!




