महाराष्ट्र राजकारण

शिवसेना फुटीचा अंतिम सामना? मुंबई महापालिकेत ८७ ठिकाणी थेट धडक

विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिका निवडणूक—आणि यंदा पहिल्यांदाच इतिहासाला वळण देणारी लढत! शिवसेना फुटीनंतर एकाच मातीत वाढलेले दोन वाघ समोरासमोर आले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा गड कोण जिंकणार, यासाठी दोन्ही बाजूंचे पहिलवान अंगाला तेल लावून मैदानात उतरले आहेत.

काळ बदलला आहे; पण संघर्ष तोच. कधी खांद्याला खांदा लावून लढलेले मित्र आज एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. मराठी मतदारांची टक्केवारी जास्त असलेल्या प्रभागांत हा सामना अधिकच पेटणार आहे. त्यामुळे मराठी मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार—यावरच निकालाची चावी असणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यात राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे ठाकल्याने लढतीला भावनिक धार मिळाली आहे.

८७ ठिकाणी थेट धडका

या निवडणुकीत एकूण ८७ प्रभागांवर थेट संघर्ष होणार आहे. त्यात ६९ जागांवर शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना,१८ जागांवर मनसे विरुद्ध शिंदे सेना असा सरळ सामना रंगणार आहे. म्हणजेच, मैदानात मित्रपक्षांची कुमक उतरलेली असली तरी दोन्ही सेनेमध्ये निकराचा संघर्ष अटळ आहे.

मराठी मुद्दे पुन्हा ऐरणीवर

मराठी बहुल भागांत निवडणूक तापताच मराठी माणूस, मराठी भाषा-संस्कृती, इतर भाषिकांची दादागिरी, मुंबई तोडण्याचा मुद्दा, गुजराती-हिंदी भाषिक वाद—हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहेत. विकासाच्या घोषणांसोबतच भावनिक राजकारण निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

तिकीटवाटप आणि नाराजी—बंडखोरांचा धसका

शिवसेना फुटीनंतर मोठ्या संख्येने आमदार शिंदेंच्या बाजूने गेले; तसेच ५० हून अधिक नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. त्यातील अनेकांना तिकीट देऊन शिंदे सेनेने अनुभवाचा किल्ला उभारला आहे.
दुसरीकडे, उद्धव सेनेने काही ठिकाणी निष्ठावंतांना तर काही ठिकाणी ताज्या दमाच्या उमेदवारांना संधी दिली आहे. मात्र, भाजपसोबत युती केल्याने काहींना तिकीट मिळाले नाही, तर मनसेला जागा सोडल्यामुळे काही ठिकाणी उद्धव सेनेतील इच्छुक नाराज आहेत.हेच बंडखोर कुणाला धक्का देणार—याची उत्तरे मतपेटीतच दडलेली आहेत.

प्रचाराचा झंझावात—कोणाचा जोर जास्त?

जशी प्रचाराची रणधुमाळी वेग घेईल, तशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरतील—आणि तसाच मराठी बाण्याचा मुद्दा पुन्हा पेटेल, अशी मुंबईत चर्चा आहे. यामुळे शिंदे सेनेसाठी आव्हान वाढेल का? आणि त्या वेळी शिंदे सेनेला भाजपा किती बॅकअप देते—याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत यंदा निवडणूक केवळ विकासकामांवर नाही, तर ओळख, भावना आणि विश्वास यांवर लढली जाणार आहे. ८७ प्रभागांत रंगणाऱ्या या महासंग्रामात कोण डरकाळी फोडणार—हे निकालाच्याच दिवशी स्पष्ट होईल.
तोपर्यंत मात्र एक नक्की—मुंबईच्या रस्त्यांवर, प्रभागांत आणि चौकाचौकांत ‘सेना विरुद्ध सेना’चा आवाज आणखीच बुलंद होणार आहे!

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *